इस्त्रायल-इराण तणाव: इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या अंतर्गत राजकारणाबाबत एक मोठा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर इराणची सूत्रे हाती घेतलेले त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी हे सध्या एका गुप्त बंकरमध्ये लपलेले आहेत.
काय आहे प्रकरण? नेतन्याहू यांनी एका मुलाखतीत सांगितले की, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात मोजतबा खामेनी गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात त्यांचे वडील अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सूचित केले. सध्या मोजतबा यांच्यावर गुप्त ठिकाणी उपचार सुरू असून, त्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना जगासमोर आणले जात नाहीये.
सत्तेवर पकड नाही आणि बंडाची भीती: नेतन्याहू यांच्या दाव्यानुसार, मोजतबा खामेनी यांची आपल्या वडिलांप्रमाणे प्रशासनावर आणि लष्करावर मजबूत पकड नाही. इराणमध्ये सध्या सत्तेसाठी अंतर्गत गटबाजी सुरू असून, तिथले शासन १९७९ च्या क्रांतीनंतरच्या सर्वात कमकुवत टप्प्यात आहे. इराणमधील वाढती महागाई आणि आर्थिक संकटामुळे जनता रस्त्यावर उतरून बंड करेल, अशी भीती तिथल्या राज्यकर्त्यांना सतावत आहे.
अणुबॉम्बचा धोका टळला? इस्त्रायलने असाही दावा केला आहे की, जर वेळीच पावले उचलली नसती, तर इराणने पुढच्या एक-दोन महिन्यात अणुबॉम्ब तयार केला असता. इस्त्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणचे क्षेपणास्त्र निर्मिती केंद्र आणि पेट्रोकेमिकल प्लांटचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे त्यांची लष्करी ताकद काही प्रमाणात कमकुवत झाली आहे.
