HomekonkanChiplunशिवाजी चौक - बहादूरशेख रस्ता रुंदीकरणासाठी बजावल्या नोटिसा

शिवाजी चौक – बहादूरशेख रस्ता रुंदीकरणासाठी बजावल्या नोटिसा

या मार्गावरील रस्त्याचे सुमारे १५ मीटर रुंदीकरण होणार आहे.

शहरातील शिवाजी चौक ते बहादूरशेख रस्ता रुंदीकरणासंदर्भात नगरपालिका प्रशासनाकडून प्राथमिक कार्यवाही सुरू झाली आहे. त्यादृष्टीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या व्यावसायिक व रहिवास इमलाधारकांना रुंदीकरणासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. परिणामी, संबंधित जागामालकांकडून संभ्रम व्यक्त करत नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्याचवेळी गोवळकोट येथील एका जागेचे आरक्षण प्रशासनाने रद्द करण्याच्या प्रक्रियेमुळे त्या विरोधात परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. शहरातील शिवाजी चौक ते बहादूरेशख हा मुख्य वर्दळीचा रस्ता रुंद करण्यासाठी महिनाभरापूर्वी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने पाहणी करून रेखांकन प्रक्रिया राबविली. त्यानंतर आता प्रशासनाकडून रुंदीकरणाच्या कार्यवाहीला प्राथमिक स्तरावर सुरुवात झाली आहे. त्यानुसार संबंधित मार्गावरील दोन्ही बाजूंकडील रहिवास व व्यापार इमारतधारकांना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या मार्गावरील रस्त्याचे सुमारे १५ मीटर रुंदीकरण होणार आहे. त्यानुसार सद्यःस्थितीत असलेल्या रस्त्याच्या रुंदीपेक्षा आवश्यक जागा ताब्यात घेतली जाणार आहे. त्याप्रमाणे संबंधित जागामालकांनी याबाबत सूचना व हरकती नोंदवाव्यात, तसेच जागेचा मोबदला अथवा वाढीव क्षेत्रफळ याबाबतही प्रशासनाकडे मागणी करावी, अशा स्वरूपाची नोटीस बजावण्यात आली आहे.

या नोटिसीमध्ये संबंधित मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या जागेचे क्षेत्रफळ किती आहे, त्याचा जागामालक कोण आहे, तसेच रुंदीकरणात किती जागा घेतली जाणार आहे, हरकत नोंदविण्यासाठी किती कालावधी आहे?, अशा अनेक मुद्द्यांची सविस्तर माहिती नसल्याने काही जागामालकांचा गोंधळ उडाला आहे. शिवाजी चौक ते बहादूरशेख हा संपूर्ण मार्ग १५ मी. रुंदीचाच होणार की, कमी-जास्त प्रमाणात रुंद केला जाणार, त्याचा मोबदला कोणत्या दराने मिळणार, मोबदल्याची रक्कम कधी मिळणार, अशा अनेक शंका जागामालकांकडून उपस्थित होऊ लागल्या आहेत.

गोवळकोट शाळा आरक्षण रद्दला विरोध – प्रशासनाने महिनाभरापूर्वी गोवळकोट येथील स्वयंभू गणपती मंदिराशेजारी मालमत्ता सर्व्हे क्र. १७०/३ ब, शहर सर्व्हे क्र. ७८२ येथील आरक्षण क्र. १५ व १६ प्राथमिक शाळेसाठी करण्यात आले होते, ते रद्द करण्याचे निवेदन प्रसिद्ध केले होते. निवेदन प्रसिद्ध झाल्यावर या विभागात परिसरातील नागरिकांनी आरक्षण रद्द करू नये, त्याचप्रमाणे ही जागा तातडीने विकसित करावी, अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्ष सकपाळ यांना दिले आहे. हे निवेदन देताना वसंत हरवडे, विजय खापरे, दीपक निवाते, संदीप बांद्रे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments