मंडणगड तालुक्याच्या सिंचनक्षमतेत मोठी भर घालणारे तिडे गावातील लघु आकाराचे माती धरण अखेर पूर्णत्वास आले असून, तालुक्यात पूर्ण झालेल्या धरणांमध्ये याचा पहिला क्रमांक लागला आहे. राज्यशासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे परिसरातील शेतीविकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. २००९ मध्ये सुरू झालेल्या या धरणाचे काम कोणत्याही मोठ्या अडचणींशिवाय पूर्ण झाले. दरवर्षी धरणात पूर्णक्षमतेने पाणीसाठा होत असून, धरणाची एकूण साठवण क्षमता ७.५०७ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. तिडे, तळेघर, टाकडे, वलौते, पिंपळोली आणि पालघर या गावांचा या धरणाच्या कार्यक्षेत्रात समावेश आहे. लघुपाटबंधारे विभागाने पाइपलाइनद्वारे सिंचन क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्यामुळे तिडे परिसरातील शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामात कलिंगड, जनावरांचा चारा तसेच विविध भाजीपाला पिकांची लागवड करणे शक्य झाले आहे. पूर्वी पावसावर अवलंबून असलेली शेती आता हळूहळू सिंचनाखाली येत असल्याचे चित्र दिसत आहे.
पडीक जमीन सिंचनाखाली येणे आवश्यक – तुळशी, भोळवली आणि चिंचाळी धरणांमध्ये पूर्वी गळती व तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या; मात्र त्या वेळी झालेल्या दुर्लक्षामुळे धरणांच्या मजबुतीचा प्रश्न गंभीर बनला होता. अशा पार्श्वभूमीवर तिडे धरणाचे यशस्वी पूर्णत्व हे तालुक्यासाठी दिलासादायक ठरले आहे. या धरणामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार असून, शेतकऱ्यांनी पडीक जमीन सिंचनाखाली आणून पाण्याचा नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक आहे. दुबार शेतीचे प्रयोग या भागात यशस्वी होत असून, भविष्यात तिडे धरणाचे पाणी मंडणगडच्या कृषी विकासाचा प्रमुख आधार ठरणार आहे.
आणखी पाच धरणांची कामे अपूर्ण – मंडणगड तालुक्यातील तुळशी, भोळवली, चिंचाळी, पंदेरी आणि वेळास येथील धरणांची कामे तीन दशकांपूर्वी सुरू झाली असली तरी तांत्रिक अडचणी व रखडलेल्या कामांमुळे ती अद्याप अपूर्ण आहेत. २०१९ मधील तिवरे धरण दुर्घटनेनंतर धरण सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पंदेरी धरणाला तडे गेल्यानंतर प्रशासनाने दुरुस्ती व सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
