शेलारवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या डावा व उजवा या दोन्ही कालव्यांना बंदिस्त नलिकांद्वारे रूपांतरित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कामाला गती मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बारमाही शेतीसाठी मुबलक व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून, परिसरातील शेती विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पारंपरिक कालव्यांद्वारे होणारी पाण्याची गळती रोखण्यात पाटबंधारे विभागाला यश मिळणार आहे. बंदिस्त नलिकेद्वारे पाणी वाहून नेले जाणार असल्याने आवर्तन काळात पाण्याची गळती थांबल्याने सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांना सिंचन क्षेत्राचा लाभ मिळणार आहे. शेलारवाडी प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र ७८५ हेक्टर असून, प्रकल्पास उजवा व डावा असे दोन कालवे प्रस्तावित आहेत. प्रकल्पाचे कालवे हे बंदिस्त नलिकाद्वारे प्रस्तावित असल्याने पाणी वहनासाठी वापरण्यात येणारे पाईप जमिनीच्या खालून साधारण दोन मीटर खोलीने जाणार आहेत. त्यामुळे शासनाला कालव्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन करणे गरजेचे नाही.
पाईपलाईनसाठी आवश्यक जमीन मूळ मालकाच्या नावानेच राहणार आहे. महसूल विभाग, कृषी विभाग व जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यांकन करण्यात येणार आहे. या मूल्यांकनाचा मोबदला संबंधित मालकाच्या बँकखात्यात परस्पर जमा होणार आहे. शेलारवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याद्वारे लवेल, सवेणी, हेदली व भोस्ते या गावातील शेतकऱ्यांना तर डाव्या कालव्याद्वारे सवेणी व ऐनवरे या गावांच्या शेतीस रास्तदरामध्ये मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे कामे करणे, या शासनाचा विविध धोरणात्मक निर्णयापैकी एक असा अतिशय महत्त्वाकांक्षी निर्णय आहे.
शेतीमुळे पर्यायी उत्पन्नाचे साधन – सद्यःस्थितीमध्ये शेलारवाडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात सदर कामास प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर सुरुवात करण्यात आली आहे. प्रथम टप्यात प्रकल्पाचे उजव्या कलव्याचे काम प्रस्तावित आहे. लवेल, सवेणी, हेदली, भोस्ते या गावांतील शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करून शेतीमधील उत्पन्न वाढवले पाहिजे. फळबाग लागवड केली पाहिजे त्यामुळे मुंबई, पुण्याला जाऊन कामधंदा करण्यापेक्षा शेतीमधील उत्पन्न हा अजून एक सबळ असा आर्थिक पर्याय उपलब्ध होणार आहे.
