HomeDapoliतांत्रिक त्रुटींमुळे नुकसान झाले असल्यास भरपाई - महावितरणकडून पाहणी

तांत्रिक त्रुटींमुळे नुकसान झाले असल्यास भरपाई – महावितरणकडून पाहणी

बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली.

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेत बुधवारी (ता. १८) उच्चदाबामुळे (हायव्होल्टेज) व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या संदर्भात ‘दैनिक सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची गंभीर दखल घेत लोकप्रतिनिधींसह महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २०) बाजारपेठेला भेट देऊन पाहणी केली. लाईन तुटल्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन हे नुकसान झाले आहे का, याची तपासणी करण्यासाठी आमच्या खात्यातर्फे स्वतंत्र पंचनामा केला जाईल. तांत्रिक त्रुटीमुळे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाल्यास भरपाईसंदर्भात तातडीने पावले उचलली जातील, असे महावितरण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बुधवारी गावतळे बाजारपेठेत महावितरणची एलटी लाईन तुटल्याने वीजप्रवाहात अचानक मोठी वाढ झाली. यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे फ्रीज, एलईडी टीव्ही, राऊटर, सीसीटीव्ही कॅमेरे, पंखे, प्रिंटर आणि कूलरसारखी महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली. या घटनेत व्यापाऱ्यांचे सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले होते.

या घटनेची बातमी प्रसिद्ध होताच महावितरणचे दापोली उपकार्यकारी अभियंता बंडाळे यांनीही यावेळी व्यापाऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. या पाहणी दौऱ्यावेळी स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते. बाधित व्यापाऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी दिले. जालगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य किशोर देसाई, टेटवली पंचायत समिती सदस्य व दापोलीचे गटनेते नीलेश शेठ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी व्यापारी संघटनेशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. लोकप्रतिनिधींच्या या सक्रियतेमुळे नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना आता मदतीची आशा निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments