राहुल देशपांडे यांनी घटस्फोट आणि ट्रोलिंगवर सोडलं मौन | Rahul Deshpande on Divorce

"तो अध्याय संपला..."; १७ वर्षांच्या संसारानंतर नेहा देशपांडे आणि राहुल का झाले विभक्त?

Must read

शास्त्रीय गायकीच्या वारशाने आणि आपल्या सुमधुर आवाजाने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. कलेच्या प्रवासात नेहमीच सोबत असणारे राहुल आणि त्यांची पत्नी नेहा देशपांडे यांनी लग्नाच्या १७ वर्षांनंतर कायदेशीररीत्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा राहुल यांनी सोशल मीडियाद्वारे केल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, आता त्यांनी एका मुलाखतीत या प्रकरणावर आणि त्यानंतर झालेल्या ट्रोलिंगवर मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.

घटस्फोटाची पोस्ट सोशल मीडियावर का केली?

राहुल देशपांडे सांगतात की, एक कलाकार म्हणून ते आपल्या आयुष्याबाबत नेहमीच पारदर्शक राहिले आहेत. “मी एक माणूस म्हणून खूप प्रामाणिक आहे. सोशल मीडियावर मी नेहमीच माझ्या मुलीचे (रेणुका), माझे आणि नेहाचे फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांना माझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी माहित होत्या, मग आयुष्यातील हा महत्त्वाचा बदल लपवून ठेवण्यात काय अर्थ? हा अध्याय आता संपला आहे, हे माझ्या चाहत्यांना सांगणे माझी जबाबदारी होती,” असे राहुल यांनी स्पष्ट केले.

ट्रोलिंग आणि अफवांवर स्पष्ट उत्तर

घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर राहुल यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. कुणी त्यांच्या स्वभावावर बोट ठेवले, तर कुणी तिसऱ्या व्यक्तीच्या उपस्थितीचा संशय व्यक्त केला. यावर राहुल म्हणतात, “घटस्फोट कधीच मुद्दामहून होत नाही. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. कोणा एकाची चूक नसते, तर दोन्ही बाजूंनी काही गोष्टी जुळून येत नाहीत. लोक विनाकारण याचा मोठा बाऊ करतात. ‘याचं कुठेतरी बाहेर लफडं असेल’ इथपर्यंत अफवा पसरवल्या गेल्या, ज्याचा नेहा आणि रेणुकाला खूप त्रास झाला.”

नातं संपलं तरी मैत्री कायम

लग्नाचं नातं संपलं असलं तरी राहुल आणि नेहा आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. “आम्ही कायदेशीररीत्या वेगळे झालो असलो तरी, आम्ही रेणुकाचे आई-वडील आहोत आणि ते नातं कायम राहील. आमच्यात आजही कोणताही कटुता नाही,” असे सांगत राहुल यांनी एका परिपक्व नात्याची ओळख करून दिली आहे.

वैयक्तिक आयुष्यातील हे वादळ शांत करत, राहुल आता पुन्हा एकदा आपल्या संगीताच्या प्रवासाकडे लक्ष केंद्रित करत आहेत.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article