भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर जमीन हडपल्याचा गंभीर आरोप | मिरा-भाईंदर राजकीय संघर्ष

मिरा-भाईंदरमध्ये राजकीय खळबळ: नरेंद्र मेहता थेट पोलीस ठाण्यात; भूमिपुत्राची जमीन हडपल्याचा दावा.

Must read

ठाणे: मिरा-भाईंदरच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेली राजकीय जुगलबंदी आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहे.

नुकताच नरेंद्र मेहता यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आणि समर्थकांसह कासारवडवली पोलीस ठाणे गाठले. यावेळी त्यांनी मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्या समर्थकांवर एका स्थानिक भूमिपुत्राची जमीन बेकायदेशीरपणे हडपल्याचा गंभीर आरोप केला आहे.

नेमके प्रकरण काय? नरेंद्र मेहता यांच्या दाव्यानुसार, भाईंदरपाडा येथील रहिवासी असलेल्या ‘भोईर’ या भूमिपुत्र कुटुंबाची सुमारे १,२१९ चौरस मीटर जमीन बळकावण्यात आली आहे. या कुटुंबाची एकूण २,४३९ चौरस मीटर जमीन असून, त्यातील अर्ध्याहून अधिक भागावर अतिक्रमण करण्यात आल्याचे मेहतांचे म्हणणे आहे. या अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मेहता यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर थेट पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वादाची पार्श्वभूमी: हा संघर्ष केवळ जमिनीपुरता मर्यादित नसून त्याला जुनी राजकीय किनार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी नरेंद्र मेहतांना एक खरमरीत पत्र लिहिले होते. मेहता यांनी “प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते” असे विधान केल्याचा आरोप करत पूर्वेश यांनी मेहतांच्या भाषेवर टीका केली होती. तेव्हापासून या दोन गटांत तणाव वाढला होता.

दुसरीकडे, प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी आयोजित केलेल्या ‘जनता दरबारात’ नरेंद्र मेहता यांनी लोकांच्या जमिनी हडपल्याच्या तक्रारी येत असल्याचे सांगून, त्यांच्या विरोधात चौकशी सेल नेमण्याचे संकेत दिले होते. आता मेहतांनी थेट सरनाईकांवरच जमीन हडपल्याचा आरोप केल्याने मिरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article