मुंबईची शान आणि लाखो गोरगरिबांचा आधारवड असलेल्या परळच्या ‘केईएम’ (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाचे नाव आता लवकरच बदलणार आहे. राज्याचे मंत्री आणि भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालयाचे नामांतर करण्याबाबत जो पाठपुरावा केला होता, त्याला आता मोठे यश मिळाले आहे. रुग्णालय प्रशासनाने या नामांतराच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली असून, आता या रुग्णालयाला नवे भारतीय नाव मिळणार आहे.
काय आहे नवीन नाव? मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सुचवल्यानुसार, ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ या नावाऐवजी आता हे रुग्णालय ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ या नावाने ओळखले जाईल. विशेष म्हणजे, नवीन नाव देताना त्याचे संक्षिप्त रूप (Abbreviation) हे पूर्वीप्रमाणेच ‘केईएम’ (KEM) राहील, याची काळजी घेण्यात आली आहे. ‘किंग एडवर्ड’ हे नाव वसाहतवादाचे प्रतीक असून भारतीय संस्कृतीचा गौरव करणारे नाव असावे, अशी भूमिका लोढा यांनी मांडली होती.
प्रशासकीय प्रक्रियेला वेग हा प्रस्ताव आधी पालिकेच्या आरोग्य समितीकडे पाठवण्यात आला होता. आरोग्य समितीने यावर सकारात्मक चर्चा करून तो मंजुरीसाठी महापालिका आयुक्तांकडे पाठवला. आता प्रशासनाकडूनही या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्याने नामांतराचा मार्ग मोकळा झाला आहे.
राजकीय पडसाद एकीकडे प्रशासनाने ही मागणी मान्य केली असली तरी, दुसरीकडे राजकारण तापू लागले आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि इतर काही संघटनांनी या नामांतराला तीव्र विरोध दर्शवला आहे. केईएम हे नाव केवळ रुग्णालय नसून ती मुंबईची एक ऐतिहासिक ओळख आहे, त्यामुळे त्यात बदल करू नये, असे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र, लोढा आणि सत्ताधारी गट आपल्या निर्णयावर ठाम असून, हा बदल भारतीय अस्मितेसाठी आवश्यक असल्याचे सांगत आहेत.
