मैदानावरील मोठमोठ्या गोलंदाजांना आपल्या बॅटने घाम फोडणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नुकताच एका वेगळ्याच अनुभवाने भारावून गेला. निमित्त होतं पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ‘गुहिर’ गावात आयोजित एका विशेष कार्यक्रमाचं. या कार्यक्रमात एका चौथीतील चिमुकलीने आपल्या अस्खलित भाषणाने चक्क क्रिकेटच्या देवालाही मंत्रमुग्ध केलं.
काय आहे नेमकी घटना? ‘सचिन तेंडुलकर फाऊंडेशन’च्या माध्यमातून पालघरच्या दुर्गम भागात सामाजिक कार्याचा ओघ सुरू आहे. गुहिर गावात फाऊंडेशनच्या ‘क्लायमेट स्मार्ट व्हिलेज’ या उपक्रमांतर्गत १३० घरांमध्ये सौर ऊर्जेचे (Solar Panels) वाटप करण्यात आले. या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी स्वतः सचिन तेंडुलकर गावात उपस्थित होता.
आपल्या लाडक्या क्रिकेटपटूला पाहण्यासाठी संपूर्ण गाव लोटलं होतं. यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या एका चौथीच्या विद्यार्थिनीने स्टेजवर येऊन भाषण केलं. तिने आपल्या निरागस पण धारदार आवाजात गावातील बदल आणि सौर ऊर्जेचे महत्त्व पटवून दिले. तिचे ते आत्मविश्वासपूर्ण बोलणे ऐकून सचिन तेंडुलकर केवळ भारावूनच गेला नाही, तर त्याने कौतुकाने त्या चिमुकलीची पाठ थोपटली आणि तिची शाबासकी दिली.
गावकऱ्यांचा सचिनला ‘पालघर’ स्टाईलने सन्मान सचिनने या गावासाठी केलेल्या मदतीबद्दल गावकऱ्यांनीही त्याचे जंगी स्वागत केले. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत गावकऱ्यांनी सचिनचा पारंपरिक पद्धतीने सत्कार केला. यावेळी सचिनने सौर ऊर्जा प्रकल्पाची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधत ‘क्लायमेट स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना कशी फायदेशीर ठरेल, यावर चर्चा केली
