नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीने नाशिकमध्ये वेग घेतला असतानाच, प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून तब्बल ७० कोटी रुपयांची दोन कंत्राटे मिळवल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
नेमका प्रकार काय? सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरात विविध विकासकामे आणि सोयीसुविधांची आखणी केली जात आहे. याच कामांच्या नावाखाली मोठा आर्थिक गैरव्यवहार करण्याचा डाव अज्ञात भामट्याने आखला होता. आरोपीने कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष प्रवीण गेडाम यांची हुबेहूब बनावट सही तयार केली. या स्वाक्षरीचा गैरवापर करून ३५-३५ कोटी रुपयांचे दोन बनावट ‘वर्क ऑर्डर’ (कामाचे आदेश) तयार करण्यात आले.
असा झाला भांडाफोड कुंभमेळ्याच्या कामांची गडबड सुरू असताना हे बनावट कंत्राट पत्रे प्राधिकरणाच्या निदर्शनास आली. जेव्हा ही कागदपत्रे अध्यक्ष प्रवीण गेडाम यांच्यासमोर गेली, तेव्हा त्यांनी त्यावर आपली स्वाक्षरी नसल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षांच्या सतर्कतेमुळे ७० कोटी रुपयांचा हा मोठा घोटाळा होता होता टळला. सिंहस्थाच्या निमित्ताने प्रशासकीय यंत्रणेत शिरकाव करून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा हा प्रयत्न फसला आहे.
पोलीस तपास सुरू एवढ्या मोठ्या रकमेचे कंत्राट आणि थेट प्राधिकरणाच्या अध्यक्षांची खोटी सही, यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हे काम केवळ एका व्यक्तीचे नसून त्यामागे एखादी मोठी टोळी किंवा अंतर्गत साटेलोटे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक रोड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू केला असून, हे बनावट दस्तऐवज नेमके कोठून आले आणि कोणाला कंत्राट देण्याचा हेतू होता, याचा शोध घेतला जात आहे.
