महाराष्ट्र विधान परिषदेच्या २०२६ च्या निवडणुकीसाठी राजकारण चांगलंच तापलं आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना महाविकास आघाडीत (MVA) मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनपेक्षितपणे अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस नाराज झाली आहे. यामुळे आता काँग्रेसनेही आपला स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नेमकं प्रकरण काय? काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, “इंडिया आघाडी म्हणून जेव्हा काही निर्णय घेतले जातात, तेव्हा त्याची एक ठराविक पद्धत असते. मात्र, विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मित्रपक्षांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्यामुळे आता आमच्याकडे उमेदवारी अर्ज भरण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.”
काँग्रेसचा असा दावा आहे की, याआधीच्या राज्यसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता शरद पवार गटाने काँग्रेसला साथ द्यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस आणि शरद पवार गटाची अशी इच्छा होती की उद्धव ठाकरेंनी स्वतः ही निवडणूक लढवावी, पण ठाकरेंनी अंबादास दानवेंचे नाव पुढे केल्याने वादाची ठिणगी पडली आहे.
अंबादास दानवेंसाठी विजय कठीण? विधान परिषदेच्या एका जागेसाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ आहे, ज्यामध्ये त्यांचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र, जर काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार दिला, तर मतांचे विभाजन होईल आणि अंबादास दानवे यांच्या विजयाचा मार्ग खडतर होईल.
भाजपची ‘वेट अँड वॉच’ भूमिका महाविकास आघाडीतील हा अंतर्गत वाद पाहून भारतीय जनता पक्षाने सावध पवित्रा घेतला आहे. भाजप आता या वादाचा फायदा घेत आपला सातवा अतिरिक्त उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. जर मविआमध्ये फूट पडली, तर भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याची शक्यता बळावली आहे.
