डिहायड्रेशन म्हणजे नेमकं काय?
सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा लहान मुलांच्या शरीरातून घामावाटे किंवा लघवीवाटे बाहेर पडणाऱ्या द्रवाचे प्रमाण, त्यांनी घेतलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असते, तेव्हा ‘डिहायड्रेशन’ची स्थिती निर्माण होते.
मुलांमधील सुरुवातीची लक्षणे कशी ओळखाल? पुण्यातील मदरहूड हॉस्पिटलचे नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. तुषार पारिख यांच्या मते, गंभीर डिहायड्रेशन ओळखणे सोपे असते, मात्र सुरुवातीच्या टप्प्यातील ‘सबक्लिनिकल’ डिहायड्रेशन पालकांच्या लक्षात येत नाही. मुलांमध्ये खालील बदल दिसल्यास सावध व्हा:
-
मुलांची चिडचिड वाढणे.
-
सतत थकवा जाणवणे किंवा सुस्त होणे.
-
भूक मंदावणे.
-
लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा लघवीचा रंग गडद पिवळा होणे.
-
डोकेदुखी किंवा एकाग्रता कमी होणे.
काय काळजी घ्यावी? (तज्ज्ञांचे उपाय) १. भरपूर पाणी पाजा: मुलांना दिवसभरात किमान २ ते ३ लिटर पाणी पिण्याची सवय लावा. तहान लागण्याची वाट न पाहता त्यांना ठराविक वेळाने पाणी द्या. २. नैसर्गिक पेये: साध्या पाण्यासोबतच नारळपाणी, ताजे ताक, आणि लिंबू सरबत द्या. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स टिकून राहतात. ३. फळांचा समावेश: आहारात कलिंगड, संत्री, द्राक्षे आणि काकडी यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा समावेश करा. ४. बाहेर जाणे टाळा: दुपारच्या वेळी (१२ ते ४) मुलांना कडक उन्हात खेळायला पाठवू नका. ५. कपड्यांची निवड: मुलांना नेहमी हलके, सुती आणि सैल कपडे घाला, जेणेकरून शरीराची हवा खेळती राहील. ६. खाण्यापिण्यावर नियंत्रण: तेलकट, जंक फूड आणि हवाबंद डब्यातील पदार्थ देणे टाळा.
उन्हाळ्यात मुलांच्या लघवीच्या प्रमाणाकडे आणि त्यांच्या वर्तनाकडे लक्ष दिल्यास आपण डिहायड्रेशनचा धोका वेळीच रोखू शकतो.
