प्राजक्ता माळीने का सुरू केला दागिन्यांचा व्यवसाय? अभिनेत्रीने सांगितले स्पष्ट कारण!

'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमात प्राजक्ताने उलगडला तिचा उद्योजिका होण्यापर्यंतचा प्रवास.

Must read

मराठी मनोरंजन विश्वातील लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या अभिनयासोबतच एका वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. केवळ पडद्यावर दिसण्यापुरते मर्यादित न राहता, प्राजक्ताने आता व्यवसायाच्या जगातही आपली पावले रोवली आहेत. ‘प्राजक्तराज’ या तिच्या पारंपारिक मराठी दागिन्यांच्या ब्रँडमुळे ती सध्या प्रकाशझोतात आहे. पण, एक यशस्वी अभिनेत्री आणि निर्माती असताना तिला व्यवसायाची गरज का भासली? या प्रश्नाचे उत्तर तिने अलीकडेच ‘एबीपी माझा’च्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रमात अत्यंत मोकळेपणाने दिले.

आर्थिक असुरक्षितता आणि भविष्याची चिंता प्राजक्ताने सांगितले की, कलाकाराचे आयुष्य हे दिसायला ग्लॅमरस असले तरी त्यात मोठी आर्थिक असुरक्षितता असते. कलाकारांचे करिअर हे पूर्णपणे इतरांवर (दिग्दर्शक, निर्माते) अवलंबून असते. “वाचनामुळे माझ्या लक्षात आले की, अनेक मोठ्या कलाकारांची उतरत्या काळात केवळ आर्थिक नियोजनाअभावी खूप ओढाताण झाली. कोरोना काळात तर मनोरंजन सृष्टी पूर्णपणे ठप्प होती. तेव्हा मला जाणीव झाली की, केवळ एकाच गोष्टीवर अवलंबून राहून चालणार नाही,” असे प्राजक्ता म्हणाली.

महाराष्ट्राची परंपरा जपण्याचा ध्यास प्राजक्ताला ऐतिहासिक पुस्तके वाचण्याची प्रचंड ओढ आहे. या वाचनातूनच तिची महाराष्ट्राच्या संस्कृतीशी असलेली नाळ अधिक घट्ट झाली. ‘प्राजक्तराज’ सुरू करण्यामागचे एक मुख्य कारण म्हणजे लोप पावत चाललेले मराठी दागिने! प्राजक्ता सांगते, “एका लग्नासाठी मला अस्सल मराठी दागिना हवा होता, पण तो कुठेच मिळत नव्हता. जे काही उपलब्ध होते ते फक्त सोन्यात होते आणि इमिटेशनमध्ये (मशिनमेड) उपलब्ध नव्हते. तिथेच मला व्यवसायाची संधी दिसली.”

विस्मरणात गेलेले दागिने पुन्हा येणार समोर वज्रटीक, पुतळी हार, एकदाणी, बोरमाळ, चंद्रहार, चपला हार, मोहनमाळ आणि बकुळीहार यांसारख्या दागिन्यांची नावे आजच्या पिढीला केवळ ऐकून माहित आहेत. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या गळ्यातील ‘वज्रटीक’ असो किंवा तुळजाभवानीच्या गळ्यातील ‘पुतळी हार’, हे वैभव पुन्हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्राजक्ताचा मानस आहे. ‘स्वतंत्र आणि स्वाभिमानी स्त्री’ म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तिने या व्यवसायाची निवड केली आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article