नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा पहिला विदेश दौरा भारतात; भारत-नेपाळ संबंधांत सुधारणा.

पंतप्रधान मोदींचे निमंत्रण स्वीकारले; १०० रुपयांच्या ड्युटी नियमातही सवलत मिळणार.

Must read

नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या राजकीय बदलांनंतर आता परराष्ट्र धोरणाबाबत महत्त्वाची हालचाल पाहायला मिळत आहे. नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बालेंद्र शाह (बालेन शाह) त्यांच्या पहिल्या अधिकृत परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड करण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी त्यांच्या काळात थायलंडला प्राधान्य दिले होते, मात्र बालेन शाह यांनी भारतासोबतचे संबंध दृढ करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.

काय आहे नियोजित दौरा? नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने या दौऱ्यासाठी आवश्यक तयारी (होमवर्क) सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काठमांडूमध्ये दोन्ही देशांच्या सचिव स्तरावरील बैठक होईल. त्यानंतर नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री स्तरावर चर्चा होऊन पंतप्रधान शाह यांच्या दौऱ्याच्या तारखा आणि मुख्य अजेंडा निश्चित केला जाईल. नेपाळचे परराष्ट्र मंत्री खनाल यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान शाह यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निमंत्रण स्वीकारले आहे.

सीमावर्ती नागरिकांना मोठा दिलासा या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने सीमेवरील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय सीमेवरून १०० नेपाळी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू आणण्यावर लावलेला ‘कस्टम ड्युटी’चा (सीमा शुल्क) कठोर नियम आता शिथिल करण्यात येत आहे. या नियमामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये मोठा रोष होता. आता सरकारने व्यावहारिक भूमिका घेत हा नियम बदलण्याची तयारी दर्शवली आहे.

भारत-नेपाळ द्विपक्षीय यंत्रणा होणार सक्रिय भारत आणि नेपाळ दरम्यान ४० पेक्षा जास्त द्विपक्षीय यंत्रणा किंवा समित्या आहेत. गेल्या काही काळापासून यातील अनेक समित्या निष्क्रिय होत्या. बालेन शाह यांच्या या दौऱ्यामुळे या समित्या पुन्हा सक्रिय होऊन जलविद्युत, व्यापार आणि कनेक्टिव्हिटी यांसारख्या क्षेत्रांत दोन्ही देशांमधील सहकार्य वाढण्याची चिन्हे आहेत.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article