भोर नराधम अत्याचार प्रकरण: देवेंद्र फडणवीसांचे पुणे पोलीस अधीक्षकांना कडक निर्देश

नसरापूरमधील चिमुरडीची हत्या; आरोपी अटकेत, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी.

Must read

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी फोनवरून चर्चा केली. नराधम आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत.

नेमकी घटना काय? नसरापूर गावातील एका चार वर्षांच्या निष्पाप मुलीला आरोपीने गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. या बातमीने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शुक्रवारी रात्री स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलीस अधीक्षकांनी समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा शनिवारी सकाळी पुन्हा एकदा नसरापूरमधील सुपर बाजार चौकात ग्रामस्थांनी ठिय्या मांडला. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी आणि तहसीलदार घटनास्थळी येऊन ठोस आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनीही घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना पाठिंबा दिला. मुख्यमंत्र्यांनी आमदारांशीही चर्चा करून सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले आहे.

आरोपीबद्दल धक्कादायक माहिती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची तक्रार मिळाल्यानंतर अवघ्या दीड तासात तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या आरोपीचा इतिहास गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. त्याच्यावर १९९८ आणि २०१५ मध्येही विनयभंगाचे गुन्हे दाखल होते. तो विकृत प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर ‘पोक्सो’सह हत्येचे कलम लावण्यात आले आहे. पोलीस आता या प्रकरणाचे दोषारोपपत्र (चार्जशीट) तातडीने सादर करण्याच्या तयारीत आहेत.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article