नियम फक्त सामान्यांसाठी? पिंपरी महापौर रवी लांडगे यांचा मिसिंग लिंकवरील फोटो वादात

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 'मिसिंग लिंक'वर महापौरांनी मोडले नियम; महामार्ग पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.

Must read

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मात्र, याच मार्गावर सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी या प्रतिबंधित मार्गावर थांबून फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमुळे आता नवा वाद निर्माण झाला असून, “नियम काय फक्त गरिबांसाठीच आहेत का?” असा सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे.

नेमका प्रकार काय? नुकतेच लोकार्पण झालेल्या ‘मिसिंग लिंक’वर ताशी १०० ते १२० किमी वेगाने वाहने धावतात. अशा वेगवान मार्गावर गाडी थांबवणे किंवा सेल्फी काढणे अत्यंत धोकादायक असल्याने महामार्ग पोलिसांनी येथे थांबण्यास सक्त मनाई केली आहे. जे कोणी नियम मोडतील, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला होता.

मात्र, हा इशारा देऊन २४ तास उलटत नाहीत तोच महापौर रवी लांडगे यांनी मुंबईला जाताना या मार्गावर गाडी थांबवून फोटो काढला. हा फोटो त्यांनी फेसबुकवर पोस्ट करताच नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. महापौरांना नियम लागू होत नाहीत का? महामार्ग पोलीस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवणार का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

व्हीआयपींसाठी वेगळा न्याय? केवळ महापौरच नव्हे, तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही यापूर्वी या मार्गावर फोटो काढून तो शेअर केला होता. त्यांच्यावरही काही कारवाई झाली की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे. एकीकडे सर्वसामान्य प्रवाशांनी गाडी थांबवल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाते, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी उघडपणे नियमांचे उल्लंघन करत असताना प्रशासन गप्प का, असा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा १८० फुटी झुलता पूल अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना आहे. मात्र, निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्याच्या नादात जीवाशी खेळ न करण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात आले आहे. आता या ‘व्हीआयपी’ नियमावलीवर पोलीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article