मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता ओमकार गोवर्धन आता एका वेगळ्या आणि ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला ओमकार आता ‘बाज्या बैज्या’ (Bajya Bajya) या आगामी मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात त्याला साथ देणार आहे लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी कासार.
काय आहे चित्रपटाची कथा? ‘बाज्या बैज्या’ हा केवळ एक चित्रपट नसून तो स्वातंत्र्यपूर्व काळातील एका सत्य घटनेवर आधारित थरार आहे. सातारा जिल्ह्यातील माणदेशातील कुकुडवाड-मायणी या भागातील दोन ऐतिहासिक नरवीर ‘बाज्या’ आणि ‘बैजा’ यांच्या शौर्याची गाथा या चित्रपटातून मांडली जाणार आहे. हे दोन्ही वीर आपल्या ‘गोफण’ नेमबाजीसाठी प्रसिद्ध होते.
ज्या काळात इंग्रजांकडे आधुनिक बंदुका आणि शस्त्रे होती, त्या काळात या दोन वीरांनी केवळ आपल्या गोफणीच्या जोरावर इंग्रज सैन्याला सळो की पळो करून सोडले होते. गोरगरीब शेतकरी आणि कष्टकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी पुकारलेला हा लढा अत्यंत प्रेरणादायी आहे. जुलमी सावकार आणि क्रूर इंग्रज अधिकारी यांच्या उरात धडकी भरवणाऱ्या या दोन वीरांचा धाडसी प्रवास अनुभवणे प्रेक्षकांसाठी नक्कीच थरारक ठरेल.
तगडी स्टारकास्ट आणि दिग्दर्शन या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथालेखन अभिषेक जावीर यांनी केले असून, ‘बोधी सिनेमा’ या संस्थेमार्फत चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. यापूर्वी ‘फुला’ या गाजलेल्या चित्रपटानंतर अभिषेक जावीर आणि संगीतकार समाधान ऐवळे ही जोडी पुन्हा एकदा ‘बाज्या बैज्या’च्या निमित्ताने एकत्र येत आहे. ओमकार आणि अश्विनी सोबतच मंजुशी खेत्री, आरोही गडदे, सनी कदम आणि उमेश बोलके यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यात असणार आहेत.
लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असून, इतिहासातील हे अपरिचित पान पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
