न्यूयॉर्क: जागतिक फॅशन विश्वातील सर्वात मोठी रात्र मानल्या जाणाऱ्या ‘मेट गाला २०२६’ (Met Gala 2026) मध्ये भारतीय श्रीमंती आणि कलेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिने आपल्या अप्रतिम सौंदर्याने आणि पेहरावाने या कार्यक्रमात सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या. यावेळी ईशाने केवळ फॅशनच नाही, तर भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जागतिक मंचावर सादर केला.
सोन्याच्या धाग्यांची कलाकृती
ईशा अंबानीने या सोहळ्यासाठी प्रसिद्ध भारतीय डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाइन केलेली ‘गोल्डन साडी’ परिधान केली होती. या साडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती चक्क शुद्ध सोन्याच्या तारांनी विणलेली होती. ‘स्वदेश’ (Swadesh) मधील कुशल कारागिरांनी यावर पिच्छवाई पेंटिंगपासून प्रेरित कलाकुसर केली आहे. ही साडी तयार करण्यासाठी तब्बल १,२०० तासांहून अधिक काळ आणि २५ हून अधिक कारागिरांची मेहनत लागली आहे.
आईच्या दागिन्यांनी सजलेलं ‘डायमंड ब्लाऊज’
ईशाच्या या लूकचे दुसरे आकर्षण होते तिचे ब्लाऊज. हे साधे ब्लाऊज नसून त्यावर १,८०० कॅरेटपेक्षा जास्त हिरे, पाचू आणि पोलकी जडवण्यात आले होते. विशेष म्हणजे, यासाठी ईशाची आई नीता अंबानी यांच्या वैयक्तिक संग्रहातील मौल्यवान दागिन्यांचा वापर करण्यात आला होता. या ब्लाऊजच्या मागील बाजूस निजामांच्या काळातील ऐतिहासिक ‘सरपेच’ देखील लावण्यात आला होता, ज्यामुळे ईशाला एक रॉयल टच मिळाला.
हातात आंब्याची पर्स आणि केसात ‘मोगरा’
ईशाने केवळ साडीच नाही तर आपल्या ॲक्सेसरीजमधूनही भारतीयत्व जपले. तिने हातात प्रसिद्ध कलाकार सुबोध गुप्ता यांनी तयार केलेली ‘आंब्या’च्या आकाराची सोन्याची छोटी पर्स (Sculpture Bag) धरली होती. तसेच, केसांमध्ये पारंपारिक मोगऱ्याच्या गजऱ्याचे आधुनिक रूप देणारी ‘जॅस्मिन हेअर स्कल्पचर’ लावली होती.
फॅशन स्टायलिस्ट अनायता श्रॉफ अदजानिया हिने ईशाचा हा संपूर्ण लूक ‘लिव्हिंग कॅनव्हास’ (जगती-जागती कलाकृती) प्रमाणे साकारला होता. ‘फॅशन हीच कला आहे’ या यंदाच्या थीमवर ईशा अंबानीचा हा पेहराव तंतोतंत उतरला असून तिने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे.
