मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि तृणमूल काँग्रेसचा खासदार युसूफ पठाण यांचे सासरे खालिद खान यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. रस्त्यावरील किरकोळ वादातून झालेल्या मारहाण प्रकरणात त्यांना भायखळा पोलिसांनी अटक केली होती. मात्र, आता त्यांना मोठा न्यायालयीन दिलासा मिळाला आहे.
नेमकं प्रकरण काय होतं? ही घटना एप्रिल महिन्यात मुंबईतील भायखळा परिसरात घडली होती. एका कारचालकाच्या गाडीमुळे रस्त्यावरील साचलेले पाणी अंगावर उडाल्यामुळे वादाला सुरुवात झाली. युसूफ खान नावाचा व्यक्ती आपली कार घेऊन जात असताना हे पाणी युसूफ पठाण यांचा मेहुणा शोएब खान याच्या अंगावर उडाले. यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.
आरोपानुसार, हा वाद इतका विकोपाला गेला की शोएबने युसूफ खानला मारहाण केली आणि त्यांच्या कारची काचही फोडली. त्यानंतर, जेव्हा युसूफ खान आपल्या कुटुंबीयांसह पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते, तेव्हा वाटेत खालिद खान (युसूफ पठाण यांचे सासरे) आणि इतर नातेवाईकांनी त्यांना अडवून पुन्हा मारहाण केल्याचा दावा तक्रारदाराने केला होता. या मारहाणीत तक्रारदाराच्या नातेवाईकाचा हात फ्रॅक्चर झाला होता.
न्यायालयाने जामीन का मंजूर केला? या प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई सत्र न्यायालयाने काही महत्त्वाचे मुद्दे नोंदवले: १. सुरुवातीच्या वादात अनुपस्थिती: ज्यावेळी रस्त्यावर पाण्याचे तुषार उडण्यावरून पहिला वाद झाला, तेव्हा खालिद खान तिथे उपस्थित नव्हते. २. तपास पूर्ण: या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, खालिद खान यांच्याकडून आता कोणतीही रिकव्हरी (वस्तू जप्त करणे) बाकी नाही. ३. वय आणि सहकार्य: खालिद खान यांचे वय आणि तपासातील टप्पे लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना जामीन देणे योग्य मानले.
न्यायालयाने १५,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला असून, पुराव्यांशी छेडछाड न करण्याच्या अटी घातल्या आहेत.
