गदिमांच्या ‘पंचवटी’ घरावरून वाद: नातू सुमित्र माडगूळकरांचा नातेवाईकांवर गंभीर आरोप.

गीतरामायण ज्या वास्तूत रचले गेले, ते घर बिल्डरला विकण्याचा प्रयत्न? पुण्यात माडगूळकर कुटुंबात कलह.

Must read

पुणे: ज्या वास्तूत अजरामर ‘गीतरामायण’ रचले गेले, ज्या भिंतींनी आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांचा सहवास अनुभवला, ते पुण्यातील ऐतिहासिक ‘पंचवटी’ निवासस्थान सध्या कौटुंबिक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी सोशल मीडियाद्वारे एक धक्कादायक पोस्ट शेअर केली असून, आपल्याच जवळच्या नातेवाईकांकडून ही वास्तू पाडण्यासाठी दबाव येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

नेमका वाद काय? पुण्यातील शिवाजीनगर भागात गदिमांचे ‘पंचवटी’ हे निवासस्थान आहे. सुमित्र माडगूळकर यांच्या दाव्यानुसार, कुटुंबातील काही जवळचे सदस्य ही ऐतिहासिक वास्तू पाडून ती जागा बिल्डरच्या घशात घालण्याच्या तयारीत आहेत. केवळ आर्थिक फायद्यासाठी गदिमांच्या आठवणी पुसल्या जात असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. “गदिमा हयात असताना म्हणायचे की, जोपर्यंत माझे ‘पंचवटी’ घर आहे, तोपर्यंत माझे अस्तित्व जिवंत राहील,” अशी आठवण करून देत सुमित्र यांनी ही वास्तू कोणत्याही परिस्थितीत विकू देणार नसल्याचा निर्धार केला आहे.

जीवाचे रान करण्याची तयारी सुमित्र यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर (पत्नी व लहान मुलगी) मानसिक दबाव टाकला जात आहे. त्यांना धमक्या दिल्या जात असून त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. “काही लोक बाहेरून गदिमांचा वारसा सांगून पुस्तके लिहितात, पण पडद्यामागे मात्र ही वास्तू नष्ट करायला निघाले आहेत,” अशी टीका त्यांनी केली आहे.

स्मारकाची लढाई आणि पंचवटीचे महत्त्व गेल्या १० वर्षांपासून सुमित्र माडगूळकर गदिमांच्या स्मारकासाठी लढा देत आहेत. आता कुठे स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे असताना ‘पंचवटी’ या त्यांच्या मूळ घरावरून हा संघर्ष सुरू झाला आहे. “माझ्यासाठी पंचवटी हे केवळ घर नसून एक मंदिर आहे. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी हे घर बिल्डरला विकू देणार नाही,” असे खुले आव्हानच त्यांनी आपल्या विरोधकांना दिले आहे.

या वादामुळे साहित्यप्रेमी आणि गदिमांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे अशी भावना व्यक्त केली जात आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article