मुंबई: आज मुंबईच्या राजकीय वर्तुळात एका आगळ्यावेगळ्या दृश्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चक्क बुलेट चालवत विधानभवन गाठले. त्यांच्यासोबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे देखील पाठीमागे बसले होते. नेहमी गाड्यांच्या ताफ्यात फिरणारे मुख्यमंत्री अशा ‘रॉयल’ थाटात दुचाकीवरून आल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली. मात्र, या स्टाईलबाज एन्ट्रीत काँग्रेसने एक मोठी तांत्रिक चूक शोधून काढली आहे.
काय आहे नेमका वाद?
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या या बुलेट प्रवासावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडियावर काही कागदपत्रे शेअर करत असा दावा केला आहे की, मुख्यमंत्र्यांनी जी ‘रॉयल एनफिल्ड ३५०’ बुलेट चालवली, तिचे पीयूसी (PUC – Pollution Under Control) प्रमाणपत्र आधीच कालबाह्य (Expired) झाले आहे.
वर्षा गायकवाड यांनी फडणवीसांच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत त्यांना टोला लगावला. काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी राहुल गांधींचा उल्लेख ‘एक्सपायर माल’ असा केला होता. तोच धागा पकडत गायकवाड म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि स्टंटसाठी जे वाहन निवडले, त्याचे पीयूसी प्रमाणपत्रच मुदतबाह्य झाले आहे. मग आता ‘एक्सपायर माल’ चालतो का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपचे स्पष्टीकरण
या आरोपांनंतर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेत स्पष्टीकरण दिले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सांगितले की, सदर वाहन हे पोलीस विभागाचे असून मुख्यमंत्री ते चालवणार असल्याने त्याची सर्व्हिसिंग आणि तपासणी आधीच करण्यात आली होती. सध्या सरकारी वाहन प्रणालीचे सर्व्हर काही तांत्रिक कारणास्तव बंद असल्याने नवीन प्रमाणपत्र अपडेट होण्यास वेळ लागत आहे, मात्र गाडी सर्व नियमांत बसणारी आहे.
एकीकडे इंधन बचतीचा संदेश देण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आणि दुसरीकडे नियमांच्या उल्लंघनावरून विरोधकांनी केलेली टीका, यामुळे सध्या हे ‘बुलेट राजकारण’ सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे.
