मुंबई: महाराष्ट्र राजकीय वर्तुळातून सध्या एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) अंतर्गत समीकरणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली असून, थेट शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी १२ मे रोजी रात्री एक अत्यंत गुप्त बैठक पार पडल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या बैठकीला केवळ सुनील तटकरेच नव्हे, तर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनीही हजेरी लावली होती. या दोन्ही बड्या नेत्यांनी शरद पवारांची गुप्तपणे भेट घेतल्याने राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे नेमका वाद आणि पार्श्वभूमी? मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) सूत्रे आपल्या हातात घेतल्यापासून पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळताच प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे या दोन्ही दिग्गज नेत्यांना साईडलाईन (बाजूला) करण्यात आल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल पटेल यांचा ‘कार्याध्यक्ष’ म्हणून आणि सुनील तटकरे यांचा ‘प्रदेशाध्यक्ष’ म्हणून उल्लेख टाळण्यात आल्याचे समोर आले होते. यामुळे सुनेत्रा पवार या दोघांवर नाराज असल्याची आणि त्यांना डावलले जात असल्याची चर्चा सुरू झाली.
गुवाहाटीहून परततानाच पडली वादाची ठिणगी? या वादाची ठिणगी १२ मे रोजी अधिक गडद झाली. प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार हे तिघेही आसाममधील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी गुवाहाटीला गेले होते. मात्र, कार्यक्रम आटोपून मुंबईला परतत असताना सुनेत्रा पवार यांनी आपल्याच पक्षाच्या या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांसोबत येणे टाळले. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानाने प्रवास करणे पसंत केले. या घटनेमुळे पटेल आणि तटकरे कमालीचे दुखावले गेल्याचे सांगण्यात येत आहे.
‘सिल्व्हर ओक’वर नेमकं काय घडलं? गुवाहाटीहून परतल्यानंतर त्याच रात्री (१२ मे रोजी) सुनील तटकरे हे शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर जाणार असल्याची बातमी समोर आली होती. मात्र, आता समोर आलेल्या नवीन आणि अत्यंत विश्वासार्ह माहितीनुसार, तटकरे पोहोचण्यापूर्वीच प्रफुल पटेल हे आधीच तिथे जाऊन बसले होते. प्रफुल पटेल यांनी अत्यंत गुप्तपणे शरद पवारांची वेळ घेतली होती आणि ते पवारांशी चर्चा करत होते, त्याच वेळी सुनील तटकरे देखील तिथे पोहोचले.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत सुरू असलेल्या अंतर्गत नाराजीनाट्यावर या तिन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ आणि सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. अजित पवार गटात स्वतःला डावलले जात असल्याचे पाहून हे दोन्ही नेते पुन्हा एकदा शरद पवारांच्या संपर्कात आले आहेत का? असा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आतापर्यंत या संपूर्ण वादावर प्रफुल पटेल यांनी मौन बाळगले होते, मात्र त्यांच्या या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काही मोठे भूकंप किंवा नाट्यमय घडामोडी घडणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
