कान्स, फ्रान्स : फ्रान्सच्या किनारपट्टीवर सध्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६’ चा (Cannes Film Festival) दिमाखदार सोहळा रंगला आहे. दरवर्षी या जागतिक मंचावर जगभरातील बड्या कलाकारांचे ग्लॅमरस वेस्टर्न लूक्स पाहायला मिळतात. पण यंदाच्या कान्स सोहळ्यात मात्र सातासमुद्रापार अस्सल मराठी संस्कृतीचा डंका वाजला आहे. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री, महाराष्ट्राची ‘फुलवंती’ प्राजक्ता माळी हिने (Prajakta Mali) कान्सच्या रेड कार्पेटवर निळ्या रंगाची पारंपरिक नऊवारी साडी नेसून अशी काही शाही एन्ट्री घेतली की, तिथे हजर असलेले परदेशी फोटोग्राफर्सही तिच्या रूपाचे कौतुक करताना थकून गेले.
समुद्रकिनाऱ्यावर नऊवारी साडीत सुंदर फोटोशूट कान्सच्या मुख्य रेड कार्पेटवर ऐतिहासिक पाऊल ठेवल्यानंतर प्राजक्ताने फ्रेंच रिव्हिएराच्या (French Riviera) निळ्याशार समुद्रकिनाऱ्यावर एक भन्नाट फोटोशूट केले आहे. निळ्या रंगाची काठपदराची नऊवारी साडी, त्यावर मॅचिंग अशी ठुशी, नाकात पारंपरिक महाराष्ट्रीयन नथ, हातात तोडे, कपाळावर चंद्रकोर आणि नऊवारी साडीचा तो रुबाबदार राजेशाही थाट… या सगळ्या साजात प्राजक्ताचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते. पाश्चात्य फॅशनचा बोलबाला असलेल्या या मंचावर प्राजक्ताने आपली संस्कृती अभिमानाने मिरवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. समुद्रकिनाऱ्यावर तिने दिलेल्या मोहक पोझेसचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण प्राजक्ता केवळ एका फॅशन स्टेटमेंटसाठी कान्समध्ये गेलेली नाही, तर यामागे एक मोठे आणि खास कारण आहे. एका नव्या ‘अभिजात मराठी ओटीटी’च्या (Marathi OTT Platform) जागतिक लाँचसाठी ती फ्रान्समध्ये पोहोचली आहे. तिच्यासोबत मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ आणि अंकिता वालावलकर यांच्यासह अनेक मराठी मान्यवर उपस्थित होते. या दिगज्जांच्या उपस्थितीत प्राजक्ताने आपल्या मराठमोळ्या सौंदर्याने या आंतरराष्ट्रीय मंचाला चार चांद लावले.
सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव तिचे हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “खऱ्या अर्थाने भारतीय सौंदर्य”, “जागतिक मंचावर मराठी संस्कृतीचा अभिमान” अशा शब्दांत तिचे कौतुक केले जात आहे. ‘आली ठुमकत नार लचकत…’ या गाण्यावर तिने शेअर केलेला व्हिडिओ आणि हे समुद्रकिनाऱ्यावरील फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.
