नवी दिल्ली:देशभरात लोकसभा आणि विविध राज्यांच्या निवडणुकांचा रणसंग्राम संपताच अपेक्षेप्रमाणे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागण्यास सुरुवात झाली आहे. आधी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर, आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही प्रतिलिटर तब्बल ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या या दरवाढीवरून आता देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्लाबोल केला आहे.
“चूक मोदी सरकारची, किंमत जनता मोजणार!”
इंधन दरात झालेल्या वाढीनंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत सरकारचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, “चुका मोदी सरकार करणार आणि त्याची जबर किंमत देशातील निष्पाप जनतेला चुकवावी लागणार. ३ रुपयांचा हा झटका तर फक्त सुरुवात आहे, उर्वरित पैशांची ‘वसुली’ सरकार येत्या काळात हप्त्या-हप्त्यांमध्ये सामान्य जनतेकडून करेल.”
निवडणूक संपताच महागाईचा झटका; राहुल गांधींची भविष्यवाणी ठरली खरी!
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी देशातील निवडणुका संपताच महागाईचा भडका उडणार आणि पेट्रोल-डिझेल महागणार, अशी जाहीर भविष्यवाणी केली होती. आधी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ९९३ रुपयांची विक्रमी वाढ झाली, आणि आता त्यापाठोपाठ पेट्रोल-डिझेलचे दरही वाढले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी व्यक्त केलेली भीती केवळ ४८ तासांत जशीच्या तशी खरी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणाला त्यांनी ‘निवडणुकीचे बिल’ असे संबोधले आहे.
लघुउद्योजक, शेतकरी आणि युवकांना बसणार मोठा फटका
राहुल गांधी यांनी आपल्या दाव्यात पुढे म्हटले आहे की, “या वाढत्या महागाईमुळे आणि इंधन संकटामुळे देश एका मोठ्या आर्थिक संकटाकडे वाटचाल करत आहे. इंधन महागल्यामुळे वाहतूक खर्च वाढेल, ज्याचा थेट परिणाम दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर होईल. हॉटेल, ढाबे, चहा विक्रेते आणि बेकरी व्यवसाय यांमुळे अडचणीत येतील आणि पर्यायाने सर्वसामान्यांच्या ताटातील जेवण महाग होईल.” या आर्थिक चक्रव्यूहाचा सर्वाधिक फटका देशातील तरुण, कष्टकरी कामगार, शेतकरी आणि लघुउद्योजकांना बसेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि भाजपचा बचाव
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात इस्रायल-इराण संघर्षा मुळे कच्च्या तेलाचे (क्रूड ऑईल) दर प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या पार गेले आहेत. यामुळे देशांतर्गत तेल कंपन्यांवर प्रचंड ताण निर्माण झाला होता, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. भाजप नेत्यांनी या दरवाढीचे समर्थन करताना म्हटले आहे की, “जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने अत्यंत जबाबदारीने परिस्थिती हाताळली असून इंधनातील दरवाढ केवळ ३ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवली आहे.”
परंतु, विरोधकांनी हा दावा फेटाळून लावला आहे. निवडणुका सुरू असताना जागतिक बाजारात तेल महाग असूनही सरकारने दर स्थिर ठेवले होते, मात्र निवडणुका संपताच जनतेवर हा बोजा टाकण्यात आला, असा थेट आरोप काँग्रेस आणि संपूर्ण ‘इंडिया’ (INDIA) आघाडीकडून केला जात आहे. या इंधन दरवाढीमुळे आता येत्या काळात महागाई सर्वसामान्यांची होरपळ करणार, हे मात्र निश्चित झाले आहे.
