वांद्र्यात रेल्वेच्या जागेवर चालला बुलडोझर; पोलिसांवर बाटल्याफेक, सौम्य लाठीचार्ज!

परदेशी ब्लॉगरच्या व्हिडिओनंतर रेल्वे प्रशासनाची मोठी कारवाई; गरीब नगरमधील ५ हजार स्क्वेअर मीटरवरील अतिक्रमण हटवताना हायव्होल्टेज ड्रामा.

Must read

मुंबईतील गजबजलेल्या वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. वांद्रे स्थानकालगत असलेल्या रेल्वेच्या हद्दीतील ‘गरीब नगर’ झोपडपट्टीमधील बेकायदेशीर बांधकामांवर पश्चिम रेल्वेने धडक कारवाई सुरू केली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही हे अतिक्रमण हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, आज या कारवाई दरम्यान प्रचंड राडा झाला. अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांना स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. एका क्षणी तर संतप्त जमावाने पोलिसांच्या दिशेने पाण्याच्या आणि काचेच्या बाटल्या, तसेच दगडफेक करण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

५ हजार स्क्वेअर मीटरवरील अतिक्रमणावर हातोडा पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या तब्बल ५ हजार स्क्वेअर मीटर जमिनीवर हे अवाढव्य अतिक्रमण पसरले आहे. मुंबईतील रेल्वेच्या हद्दीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धाडसी कारवाई मानली जात आहे. रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (GRP) यांनी एकत्रितपणे ही संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.

एका परदेशी ब्लॉगरचा व्हिडिओ आणि रेल्वे प्रशासन जागे झाले! विशेष म्हणजे या कारवाईमागे एक रंजक पार्श्वभूमी आहे. काही दिवसांपूर्वी एका परदेशी ट्रॅव्हल ब्लॉगरने मुंबईचा दौरा केला होता. त्याने वांद्रे रेल्वे लाईनच्या अगदी शेजारी वाढलेल्या या प्रचंड झोपडपट्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. रेल्वे ट्रॅकच्या इतक्या जवळ असणाऱ्या या बेकायदेशीर बांधकामांचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ माजला. ‘एबीपी माझा’ने देखील या बातमीचे गांभीर्य ओळखून ती लावून धरली. अखेर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाल्यानंतर खडबडून जागी झालेल्या रेल्वे प्रशासनाने तात्काळ या अतिक्रमणावर बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेतला.

राजकीय पाठबळ आणि कोर्टाची वारी; तरीही कारवाई रोखता आली नाही! यापूर्वीही रेल्वेने या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्थानिक पातळीवरील राजकीय पाठबळामुळे आणि अतिक्रमण करणाऱ्यांनी थेट हायकोर्टात धाव घेतल्यामुळे या कारवाईत मोठे अडथळे निर्माण झाले होते. कायदेशीर कचाट्यामुळे काही काळ ही मोहीम थंडावली होती. परंतु, सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून रेल्वेने पुन्हा एकदा पूर्ण तयारीनिशी या जागेवर आपला हक्क सांगत कारवाईचे हत्यार उपसले आहे.

पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात; कारवाई थांबणार नाही! आज झालेल्या राड्यानंतर आणि स्थानिकांचा वाढता विरोध पाहता, सुरक्षेच्या कारणास्तव घटनास्थळी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले असून रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, विरोध कितीही झाला तरी ही अतिक्रमण विरोधी मोहीम थांबणार नाही आणि संपूर्ण ५ हजार स्क्वेअर मीटरची जागा पूर्णपणे रिकामी केली जाईल.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article