पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र आणि चिंताजनक बनत चालला आहे. ओतूर परिसरातील वाघचौरे वस्तीवर गुरुवारी (२१ मे) भल्या पहाटे एका काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग घडला. मात्र, अवघ्या १३ वर्षांच्या कल्याणीने दाखवलेले अजोड धैर्य आणि प्रसंगावधानामुळे तिची १० वर्षांची लहान बहीण काव्या बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून सुखरूप बचावली.
नेमका कसा घडला थरार? ओतूर गावच्या हद्दीतील वाघचौरे वस्ती येथे राहणारी काव्या महेंद्र वाघचौरे (वय १०) आणि तिची मोठी बहीण कल्याणी महेंद्र वाघचौरे (वय १३) या दोन्ही सख्ख्या बहिणी नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घरासमोरील गोटीशिवार-मांदरणे मार्गावर मॉर्निंग वॉक करत होत्या. पहाटेची शांतता आणि गारवा यामुळे परिसरात शांतता होती. याच शांततेचा फायदा घेत रस्त्याच्या कडेला असलेल्या दाट शेतात एक बिबट्या दबा धरून बसला होता.
दोन्ही बहिणी जवळ येताच, बिबट्याने क्षणाचाही विलंब न लावता थेट १० वर्षांच्या काव्यावर झडप घातली. बिबट्याने काव्याला पकडून ओढण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या पाठीवर आपल्या तीक्ष्ण नख्यांनी दोन ते तीन मोठे वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे लहानगी काव्या रक्ताळली आणि वेदनेने किंचाळली.
बिबट्याशी थेट दोन हात! डोळ्यांसमोर लहान बहीण काळ बनून आलेल्या बिबट्याच्या जबड्यात अडकल्याचे पाहून १३ वर्षांची कल्याणी सुरुवातीला भयभीत झाली. पण, तिने आपला संयम गमावला नाही. बहिणीचे प्राण वाचवण्यासाठी कल्याणीने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता थेट बिबट्या रोखाने धाव घेतली. तिने अत्यंत आक्रमक पवित्र्यात जागेवरच जोरात आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. एका लहान मुलीचा हा प्रतिहल्ला आणि रौद्र रूप पाहून बिबट्याही काही क्षणांसाठी बिथरला. कल्याणीच्या या धाडसामुळे बिबट्याने काव्याला सोडले आणि शेतात धूम ठोकली.
ग्रामस्थांचा संताप आणि रुग्णालयाची दुरवस्था बहिणींचा आवाज ऐकून काव्याचे वडील महेंद्र वाघचौरे आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी आणि रक्ताळलेल्या अवस्थेतील काव्याला तात्काळ ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ओतूरमध्ये तब्बल १४ कोटी रुपये खर्चून एक सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आलेले आहे, मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे ते अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेले नाही. तिथे आवश्यक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी नसल्यामुळे ऐन आणीबाणीच्या वेळी जखमी मुलीला उपचारासाठी भटकण्याची वेळ आली, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
सध्या वाघचौरे मळा आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वनविभागाने तात्काळ या भागात पिंजरा लावून या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे, अशी आक्रमक मागणी संतप्त गावकऱ्यांनी केली आहे.
