२०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अजून खूप दूर असल्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात आतापासूनच मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना पक्षाने (शिंदे गट) अत्यंत आक्रमक आणि नियोजनबद्ध पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकांमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक ‘मेगा प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत राज्यातील तब्बल २०० हून अधिक विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
स्थानिक पातळीवर संघटना बळकटीकरणाचा ‘मास्टरस्ट्रोक’
राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीत विजयाचा मार्ग हा बूथ पातळीवरून जातो, हे ओळखून शिवसेनेने तळागाळात कामाला सुरुवात केली आहे. राज्यातील २०० पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नेते स्थानिक पातळीवर जाऊन ‘बूथ लेव्हल एजंट’ (BLA) नोंदणी अभियान राबवणार आहेत. याशिवाय मतदारसंघांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी नेत्यांचे दौरे आयोजित केले जात आहेत. बूथ पातळीवरील यंत्रणा जितकी मजबूत असेल, तितका पक्षाला फायदा होईल, या उद्देशाने या अभियानाला पक्षात सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.
श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी!
या महत्त्वाकांक्षी महाअभियानाची संपूर्ण धुरा एकनाथ शिंदे यांनी पक्षातील दोन अत्यंत विश्वासू नेत्यांवर सोपवली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर प्रत्येकी १०० विधानसभा मतदारसंघांची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. हे दोन्ही नेते आपापल्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात जाऊन थेट तळागाळातील कार्यकर्त्यांशी, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी आणि मतदारांशी संवाद साधणार आहेत.
पुढील तीन दिवस दौऱ्यांची रणधुमाळी
शिवसेनेच्या या मोहिमेचा बिगुल वाजला असून, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. नाशिक आणि परिसरातील संघटनात्मक आढावा घेतल्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. नाशिक दौऱ्यादरम्यान श्रीकांत शिंदेंनी स्थानिक नेत्यांना कामाला लागण्याचे स्पष्ट संकेत आणि इशारेही दिले आहेत.
दुसरीकडे, उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील आता पूर्ण ताकदीने मैदानात उतरत आहेत. उदय सामंत हे पुढील तीन दिवस मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघांचा झंझावाती दौरा करणार आहेत. दोन्ही तरुण आणि आक्रमक नेत्यांच्या या दौऱ्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले असून, या दौऱ्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
