कोरोना काळात हजारो गरजूंच्या मदतीला धावून जाणारा आणि ‘गरिबांचा मसिहा’ म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा एका संवेदनशील मुद्द्यावरून चर्चेत आला आहे. नेहमी माणसांच्या हक्कासाठी आणि मदतीसाठी तत्पर असणारा सोनू यावेळी मात्र रस्त्यावरील निष्पाप आणि मुक्या प्राण्यांच्या हक्कासाठी धावून आला आहे. पंजाब सरकारने भटक्या कुत्र्यांबाबत घेतलेल्या एका वादग्रस्त निर्णयावर सोनू सूदने तीव्र आक्षेप घेतला असून, त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप आणि चिंता व्यक्त केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकताच एक आदेश जारी केला आहे, ज्यानुसार गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर, जे कुत्रे हिंस्त्र किंवा धोकादायक वाटतील, त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून थेट ‘इच्छामरण’ (Euthanise) देण्याची परवानगीही सरकारने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर पंजाब सरकारने हे पाऊल उचलले आहे.
सोनू सूदने व्यक्त केली तीव्र नाराजी
हा निर्णय समोर आल्यानंतर सोनू सूदने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो अत्यंत भावूक आणि चिंतेत दिसत आहे. सोनू म्हणाला, “मी नुकतंच पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं एक ट्विट पाहिलं, ज्यात त्यांनी भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यात या मुक्या प्राण्यांसोबत काय अमानुष कृत्य केलं जातंय हे दिसतंय. ते व्हिडिओ पाहणं खरोखरच खूप त्रासदायक आहे.”
“कुत्रे प्रामाणिक असतात, सगळ्यांनाच शिक्षा का?”
आपली बाजू मांडताना सोनूने पुढे सांगितले की, “आपल्याला हे मान्य करावे लागेल की कुत्रा हा अत्यंत प्रामाणिक प्राणी आहे. आपल्या गल्लीबोळात अनेक लोक या कुत्र्यांना लळा लावतात, त्यांना रोज अन्न देतात. हो, हे खरं आहे की काही ठिकाणी कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. पण ज्या भागात अशी घटना घडते, तिथल्या स्थानिक लोकांना माहित असतं की कोणता कुत्रा हिंस्त्र आहे. लोक तक्रार करतात आणि अशा कुत्र्यांना बाजूला केलं जातं, हे समजू शकतं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही संपूर्ण भागातील सर्वच कुत्र्यांना पकडून घेऊन जाल आणि त्यांना थेट मृत्यूच्या दारात ढकलून द्याल.”
सोनू सूदचे प्राणीप्रेमींना आणि सरकारला आवाहन
या गंभीर समस्येवर केवळ कुत्र्यांना मारणे हा उपाय नाही, असे सोनूचे स्पष्ट मत आहे. त्याने सरकारला विनंती केली आहे की, कुत्र्यांना मारण्याऐवजी त्यांच्यासाठी सुसज्ज अशी शेल्टर होम्स (प्राणी अनाथाश्रम) तयार करण्यात यावीत.
तसेच, त्याने सर्व प्राणीप्रेमींना एकत्र येण्याचे आवाहन करत एक सोपा आणि सुंदर उपाय सुचवला आहे. सोनू म्हणाला, “मी माझ्या परीने या कुत्र्यांना हक्काचं घर मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, शक्य असेल तर या भटक्या कुत्र्यांना दत्तक घ्या. जर तुम्ही एखाद्या कुत्र्याला दत्तक घेतलं किंवा त्याची काळजी घेत असाल, तर त्याच्या गळ्यात एक ओढणी (दुपट्टा) किंवा पट्टा बांधा. जेणेकरून प्रशासनाला समजेल की या कुत्र्याची काळजी घेणारं कुणीतरी आहे आणि त्याला उचलून नेलं जाणार नाही. चला, या मुक्या प्राण्यांचा आवाज बनूया!”
सोनू सूदच्या या भूमिकेनंतर आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या सुरक्षेचा आणि मानवी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, नेटिझन्सकडून सोनूच्या या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे.
