मनोरंजन विश्वातून एक अत्यंत आनंदाची आणि गोड बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री, म्हणजेच ‘ये है मोहब्बतें’ फेम इशिता भल्ला ऊर्फ दिव्यांका त्रिपाठी हिच्या घरी अखेर मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात बालकांचे आगमन झाले आहे. लग्नाच्या तब्बल १० वर्षांनंतर दिव्यांका आणि तिचा पती विवेक दहिया यांच्या आयुष्यात हा सुवर्णक्षण आला आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी दिव्यांकाने एका नव्हे, तर दोन गोंडस जुळ्या मुलां (Twin Baby Boys) ना जन्म दिला आहे. या ‘डबल गुड न्यूज’मुळे दहिया आणि त्रिपाठी कुटुंबात आनंदाला उधाण आले आहे.
“मेरे करण अर्जुन आ गए!” – विवेक दहियाची भावनिक पोस्ट
या आनंदाच्या क्षणाची माहिती स्वतः विवेक दहियाने सोशल मीडियावर एक अतिशय गोंडस आणि कल्पक पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली. विवेकने इंस्टाग्रामवर निळ्या रंगाच्या कपड्यातील दोन लहान मुलांचे ॲनिमेटेड चित्र शेअर केले आहे, ज्यावर लिहिले होते, “आम्ही देवाकडे एक आनंद मागितला होता, पण देवाने आम्हाला म्हणाला ‘दुप्पट घ्या’ आणि त्याने आम्हाला जुळे मुलगे दिले.”
आपली आनंद व्यक्त करताना विवेकने कॅप्शनमध्ये लिहिले, “अखेर प्रतीक्षा संपली! ‘द बॉईज’चे आगमन झाले आहे. आमचे आयुष्य आता आम्ही विचार केला होता त्यापेक्षाही खूप जास्त सुंदर झाले आहे. ‘मेरे करण अर्जुन आ गए!’ मी आणि दिव्यांका (दिव) आमच्या पालकपदाच्या (Parenthood) या अद्भुत आणि नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत. आम्हा सर्वांना तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाची गरज आहे.” त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत असून चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी या स्टार जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
१० वर्षांनंतर पूर्ण झाले आई-बाबा होण्याचे स्वप्न!
दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि आदर्श जोडप्यांपैकी एक मानले जातात. ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. आधी मैत्री आणि नंतर प्रेमात रूपांतर झाल्यावर, २०१६ मध्ये ते पारंपरिक पद्धतीने भोपाळमध्ये विवाहबंधनात अडकले होते. या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांनी चाहत्यांसोबत गरोदरपणाची (Pregnancy) बातमी शेअर केली होती. त्यानंतर नुकतेच दिव्यांकाच्या डोहाळे जेवणाचे (Baby Shower) फोटो आणि मॅटर्निटी फोटोशूटही सोशल मीडियावर खूप गाजले होते.
वयाच्या ४१ व्या वर्षी आई बनून दिव्यांकाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, मातृत्व अनुभवण्यासाठी वय कधीच अडथळा ठरत नाही. आज त्यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण होत असताना घरामध्ये दोन चिमुरड्या पाहुण्यांचे आगमन झाल्याने या जोडप्याचे आयुष्य परिपूर्ण झाले आहे.
