डी. के. शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री? काँग्रेसचा ४ उपमुख्यमंत्री फॉर्म्युला!

कर्नाटकात मोठे सत्तानाट्य; सिद्धरामय्या राजीनामा देणार, शिवकुमार यांच्याकडे नेतृत्व जाण्याची शक्यता.

Must read

बेंगळुरू: कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत राजकीय संघर्षाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता असून, राज्यात लवकरच मोठा नेतृत्वबदल होण्याची चिन्हं आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत विश्वासू माहितीनुसार, कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी राज्याचे संकटमोचक आणि सध्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे राज्याची धुरा सोपवली जाऊ शकते.

काँग्रेसचा ‘सोशल इंजिनिअरिंग’ फॉर्म्युला: एकाच वेळी ४ उपमुख्यमंत्री! डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवताना पक्षात किंवा राज्यात कोणताही अंतर्गत वाद होऊ नये, यासाठी काँग्रेस हाय कमांडने एक नवा आणि मास्टरस्ट्रोक ‘फॉर्म्युला’ तयार केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार राज्यात सर्व घटकांना न्याय देण्यासाठी तब्बल ४ उपमुख्यमंत्री नियुक्त केले जाऊ शकतात. यामध्ये दलित, ओबीसी, लिंगायत आणि अल्पसंख्याक समाजातील नेत्यांना प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोणाकोणाची नावे?

  • दलित गट: या गटामधून ज्येष्ठ नेते जी. परमेश्वरा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे सुपुत्र प्रियांक खर्गे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

  • ओबीसी (OBC) गट: सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांना या गटातून उपमुख्यमंत्रीपद देऊन सिद्धरामय्या यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आहे.

  • लिंगायत समाज: कर्नाटकच्या राजकारणात महत्त्वाचा प्रभाव असलेल्या लिंगायत समाजातून एम. बी. पाटील आणि ईश्वर खांद्रे यांच्या नावांचा विचार सुरू आहे.

  • अल्पसंख्याक गट: के. जे. जॉर्ज, यु. टी. खादर आणि जमीर अहमद खान यापैकी एका नेत्याची वर्णी लागू शकते.

राहुल गांधींचा मध्यस्थी आणि ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी स्वतः सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्या बदल्यात सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी आणि मानाची भूमिका दिली जाईल. दरम्यान, बेंगळुरूमधील ‘कावेरी’ या सरकारी निवासस्थानी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात एक महत्त्वाची ‘ब्रेकफास्ट मिटिंग’ होणार आहे. या बैठकीनंतर दोन्ही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण घडामोडींवर अधिकृत भूमिका स्पष्ट करू शकतात.

या औपचारिक घोषणेपूर्वी सिद्धरामय्या सर्व मंत्री आणि आमदारांसोबत एक ‘डिनर बैठक’ देखील घेणार आहेत, ज्यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय नेते के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. डी. के. शिवकुमार यांच्या समर्थकांनी तर आधीच सोशल मीडियावर आणि बेंगळुरूच्या रस्त्यांवर त्यांना ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावायला सुरुवात केली आहे. आता काँग्रेस हाय कमांड यावर कधी अधिकृत शिक्कामोर्तब करते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article