आजतागत आपण विविध बँक्स पाहिल्या असतील, ब्लड बँक, मिल्क बँक, बुक बँक, वॉटर बँक, पैशांच्या बँक अशा अनेक प्रकारच्या बँका आपण पाहिल्या असतील. आज आपण एका विशिष्ट प्रकारच्या बँकेची माहिती घेणार आहोत. दोन वर्षांपूर्वी अकोल्यामध्ये एका वेगळ्याच संकल्पनेच्या बँकची स्थापना करण्यात आली आहे. या बँकेचे नाव आहे गोट बँक ऑफ कारखेडा. नाव ऐकून जरा वेगळच वाटत असेल पण हो हे खर आहे. नरेश देशमुख हे गोट बँक ऑफ कारखेडाचे संस्थापकीय अध्यक्ष आहेत. नरेश देशमुख हे वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातल्या कारखेडा गावाचे रहिवासी असून याच गावामध्ये ते लहानाचे मोठे झालेत. 1995 ते 2000 ही पाच वर्षे ते कारखेड्याचे सरपंच पदही भूषविले आहे. नरेश देशमुख यांची अद्यापही कारखेडा गावामध्ये शेती आणि घर आहे. मुलांच्या शिक्षणासाठी ते अकोल्यामध्ये स्थायिक झालेत. नरेश देशमुख हे अर्थशास्त्रात पदव्युत्तर आहेत.
अशी आगळी वेगळी बँक सुरू करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्याच गावातील एका शेतमजुरामूळे मिळाली. या शेतमजुराने शेतमजुरीतून कमविलेल्या पैशांमधून काही बकऱ्या विकत घेतल्या. पुढे यातून मिळालेल्या पैशामधून त्याने तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. त्यानंतर स्वत:च्या दोन मुलींची लग्नही अगदी जोमात केली. याच घटनेचा अनुभव लक्षात घेऊन ‘गोट बँक ऑफ कारखेडा’ या बँकेचा जन्म झाला. देशमुख यांनी या बँकेच्या विकासासाठी विविध गोष्टीवर पाच-सहा वर्ष कसून अभ्यास केला. अखेर 4 जुलै 2018 साली या बँकेची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली गेली. या बँकेमध्ये कोणताही पैशांचा व्यवहार केला जात नाही. परंतु, या बँकेचे व्यवहार मात्र तुम्हाला नक्कीच लखपती किंवा करोडपती बनवून सोडतील. पाहूया कसं चालते या बँकेचं कामकाज..!
नांवावरून तुम्हाला समजलच असेल कि ही बँक बक्र्यंची आहे. बकऱ्यांची कुठं बँक असते का? असा प्रश्न नक्कीच पडेल सगळ्यांना. यावर उत्तर आहे, होय. ही बँक अकोला जिल्ह्यातील सांगवी मोहाडी गावात स्थापिलेली आहे. या बँकेचे सर्व व्यवहार बकरीच्या रूपातच होतात. म्हणजेच कर्जातही तुम्हाला बकरीच मिळते, व्याजही बकरीच्याच रूपात भरावं लागतं, अन तुम्हाला डिपॉझिटही बकरीच्याच रूपात भरावं लागतं. अन तुमच्या बकरीच्या डिपॉझिटवरचं व्याजही बकरीच्याच रूपात मिळतं. म्हणजे इथे सगळ बकरीमय आहे. नरेश देशमुख यांनी अकोल्यात ही बँक 4 जुलै 2018 साली सुरू केली. देशमुख यांचं मुळगाव वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालूक्यातलं कारखेडा, म्हणून त्यांनी बँकेचं नाव गावावरून ठेवल आहे. ‘गोट बँक ऑफ कारखेडा’. नरेश देशमुख यांनी बँकेच्या असलेल्या टॅगलाईनमधून बँकेच्या कामाची आणि ध्येय्याची दिशा स्पष्ट दिसत आहे. ‘बँक ऑफ कारखेडा’ची टॅगलाईन ‘सामाजिक व आर्थिक क्रांती अशी असून, नेमकं हेच त्यांना ‘गोट बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास घडविण्याच साधन बनवायचं आहे.
देशमुख हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी असल्याने यांना अर्थशास्त्रातील कंपाऊंडींगच्या सुत्रातून ही भन्नाट कल्पना सुचली. बकरी पालन हा सुपर कंपाऊंडींगच्या सूत्रानुसार फायदा देणारा व्यवसाय. म्हणून त्यांनी बकरी बँक सुरू करण्यास योजिले. यासाठी त्यांनी 40 लाखांच्या 340 बकऱ्याची खरेदी सारून, नंतर गरजू शेतकऱ्यांना 1100 रुपये रजिस्ट्रेशन फी घेऊन एक-एक बकरी कर्ज म्हणून दिली. व ती देतांना बकरीच्या 40 महिन्याल्या चार पिल्ल बँकेला परत करण्याच्या करारावर दिली गेली. बँकेला मिळालेल्या 1100 रूपयांत बँकेने बकरी मालकाला पशुवैद्यक आणि पशुसखीच्या माध्यमातून आरोग्य, खाद्य आणि लसीकरण विषयक सल्ल्याची सुविधा पुरवली जाते. तसेच त्याच अकराशे रूपयांमध्ये बकरीचा विमासुद्धा काढला जातो. त्यामूळे बकरीला काही झालं तर लाभार्थ्याचे आर्थिक नुकसान न होता त्याची नुकसान भरपाई मिळते.
बँकेची नवीन शाखा उघडण्यासाठी कमीत कमी 100 बकऱ्यांची आवश्यकता भासते. देशमुखांनी सांगवी मोहाडी गावाला बँकेचे ‘मॉडेल व्हिलेज बनविले. नरेश देशमुख यांचा अभूतपूर्व गोट बँक ऑफ कारखेडाचा प्रयोग नक्कीच क्रांतीकारी ठरला आहे. त्यामुळे त्यांनी या प्रयोगाचं पेटंट बनवायचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रयोगाला अलिकडेच पेटंटही मिळालं आहे. त्यामुळे बँकेचा कारभार आता ‘कारखेडा कृषी उत्पादक कंपनी’ चालविते. या कंपनीचे सध्या 521 भागधारक आहेत. या गोट बँकेची पाऊले आता राज्य आणि देशाच्या सीमापार पडताना दिसत आहेत.