ब्लूमबर्गने जगातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. त्यात एलन मस्क प्रथम स्थानावर दिसले आहेत. अॅमेझॉनचे बेजॉस यांच्या संपत्तीपेक्षा एलन मस्क यांची संपत्ती सुमारे एक अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे. टेस्लाच्या शेअरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे एलन मस्क यांच्याही संपत्तीतही वाढ झाली आहे. ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या या यादीत ५०० जणांचा समावेश आहे. अॅमेझॉनचे जेफ बेजॉस २०१७ मध्ये जगातील सर्वात श्रीमत व्यक्ती होते. आता एलन मस्क यांनी बेजॉस यांना मागे टाकले आहे. एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरल्यावर सोशल मिडीयावर त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. यावर त्यांनी ‘किती विचित्र घटना आहे’ अशा आपल्या विशिष्ट अंदाजात प्रतिक्रिया दिली.
कोरोना महामारीमुळे जगासाठी २०२० हे वर्ष अडचणींचे ठरले आहे. मात्र एलन मस्कना या कोरोन कालावधीत मोठा फायदा झाला आहे. २७ अब्ज डॉलरपासून त्यांनी २०२० या वर्षाची सुरुवात केली होती. या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत सुमारे १५० अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती वाढण्याची ही पहिलीच घटना असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. टेस्लाच्या शेअरमध्येही या काळात सातत्याने वाढ झाली. त्याचाही एलन मस्क यांना फायदा झाला. तसेच मस्क यांच्याकडे स्पेसएक्सची मोठ्या प्रमाणात भागीदारी आहे. सुमारे १५ अब्ज डॉलरची त्यांची भागीदारी आहे.
स्पेस एक्सपलोरेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन किंवा स्पेस एक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर असणारे मस्क हे प्रायव्हेट स्पेस क्षेत्रात बेजोस यांचे प्रतिस्पर्धी आहेत. बेजोस यांच्याकडे ब्लू ऑरिजिन LLC ची मालकी आहे. एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरण्यामागे जेफ बेजॉस यांचा झालेला घटस्फोट हेदेखील एक कारण आहे. बेजॉस यांचा घटस्फोट झाला नसता तर ते आजही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले असते. घटस्फोटासाठी बेजॉस यांनी त्यांच्या पत्नीला संपत्तीतील मोठा वाटा दिला होता. तसेच त्यांनी काही रक्कम दानही केली आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत घट झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी ६८ कोटी डॉलरचे शेअर दान केले होते.
मागील १२ महिन्यांचा आढावा घेतल्यास हा काळ मस्क यांच्यासाठी विशेष ठरला आहे. मागील वर्षी त्यांच्या वार्षिक मिळकतीत तब्बल १५० अब्ज डॉलर्सनं वाढ झाली. इलेक्र्टीक कार निर्मात्यांच्या शेअरची किंमत गुरुवारी ४.८% नी तेजीत पाहायला मिळाली. मिळकतीत झपाट्यानं वाढ होण्यामागे टेस्लाच्या शेअरमध्ये आलेली अनपेक्षित तेजी हे मुख्य कारण आहे, असे मस्क यांनी स्पष्ट केले.