Sunday, March 7, 2021
Home Maharashtra News ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत

ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत

बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंती असून यादिवशी या पुतळ्याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, बाळासाहेबांचे पुतणे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याने दोघांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे १४ महिन्यांनी पुन्हा व्यासपीठावर एकत्र येणार असल्याने दोन्ही भावांमधील दुरावा दूर करण्यासाठी बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण निमित्त ठरो, अशी अपेक्षा शिवसैनिक आणि मनसैनिक व्यक्त करत आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक शिवाजी पार्क येथील जुन्या महापौर निवासस्थानी उभारण्याचे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वप्न आहे. मात्र, शिवसेना-भाजप युतीची सत्ता असतानाही ते स्मारक उभारण्यात शिवसेनेला काही अडचणी आल्या. दुसरीकडे बाळासाहेबांचा भव्य पुतळा मुंबईत दर्शनी भागात उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र, त्यासाठी जागेचा शोध घेतल्यानंतर अखेर रिगल सिनेमा समोरील मोकळ्या जागेत बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचे मुंबई महापालिकेकडून शिक्कामोर्तब करण्यात आले असून, पुतळा प्रबोधन संस्थेने बनवला असून मुंबई पालिका त्याची देखभाल करणार आहे.

पुन्हा जागेची अडचण आली आणि मग जागा बदलण्यात आली. रिगल सिनेमा समोरीलच श्यामप्रसाद मुखर्जी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालया जवळील जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यावर शिक्कामोर्तब झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९ फूट उंचीचा पुतळा अधिक २ फूट उंच हिरवळ चबुतरा यांसह ११ फूट उंच उभारण्यात आला आहे. शिवसेना प्रमुखांचा पूर्णाकृती पुतळा बनवण्याचे काम शिल्पकार शशिकांत वडके यांनी जोगेश्वरी येथील मातोश्री क्रीडा संकुलानजीक आमदार रवींद्र वायकर यांच्या निगराणीखाली केले आहे. आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंती असून यादिवशी या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यातील सर्वपक्षीय बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ ला निधन झाले. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर २०१५ ला गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. त्याला तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी देऊन पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला होता. पुतळा उभारताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने सदर प्रस्ताव राज्य सरकाराच्या गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. पुतळा उभारण्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्या. त्यामुळे येत्या २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments