जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी बुलढाणा जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गजानन महाराज यांचा यंदाचा 143 वा प्रगटदिन उत्सव मंदिरात फक्त अंतर्गत कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. दरवर्षी श्रींचा प्रगटदिन उत्सव श्री संस्थानामध्ये लाखो भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या उपस्थितित विविध धार्मिक कार्यक्रमासह मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, मागील वर्षापासून ओढवलेल्या कोरोनाचे संकट आता पुन्हा जोमाने सर्वत्र पसरु लागले असल्याने, तसेच कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाच्या नियमानुसार प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देशीत केले असल्याने आज असलेला श्रींचा 143 वा श्री प्रगटदिनोत्सव यावर्षी छोट्या प्रमाणावर आणि साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. धार्मिक प्रथा-परंपरेनुसार उत्सवातील कार्यक्रम मोजक्या उपस्थितीत संपन्न होतील. श्री गजानन महाराज संस्थानकडून अशी माहिती देण्यात आली.
143 वर्षापूर्वी शेगाव येथे श्रीसंत गजानन महाराज हे प्रकट झाले होते. याठिकाणी शेगाव वासियांच्या सहवासात त्यांनी आपले जीवन व्यतीत केले. त्यामुळे तेथे त्यांचा मोठा भाविक वर्ग निर्माण झाला आणि येथेच ते समाधीही तेथेच घेतली. दरवर्षी ‘गण गण गणात बोते’चे नामस्मरण करत, पारंपारिक टाळ मृदुंगाच्या निनादात श्री गजानन लाखो भक्त या सोहळ्यासाठी पायी दिंड्या-पालख्या घेऊन शेगावात दाखल होतात. सर्व दिंडी आणि पालख्यांसाठी शेगाव संस्थानच्या वतीने या विविध सोई-सुविधाही पुरवल्या जातात. राज्यभरातून शेगाव येथे महाराजांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक या प्रकटदिन सोहळ्यासाठी येत असतात. परंतु यावर्षी देखील महाराजांचा हा सोहळा कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ठराविक लोकांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
गजानन महाराजांच्या जन्मस्थाना बद्दल विशेष कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे प्रथम दर्शन 23 फेब्रुवारी 1878 मध्ये झालेले व त्या दिवशी माघ वद्य सप्तमी होती. त्यावेळी शेगाव येथे दिगंबर अवस्थेत गजानन महाराज लोकांच्या दृष्टीस पडले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हा पासूनचं माघ वद्य सप्तमी दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करण्याचा पायंडा पडला. शेगावच्या गजानन मंदिरात या दिवशी मोठा उत्सव असतो. चरण पादुका पूजन, पालखी सोहळा असे अनेक अंतर्गत विधी पार पाडले जातात. या दिनाचे औचित्य साधून देशभरातून लाखो संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. शेगावप्रमाणे इतर ठिकाणी असलेल्या गजानन महाराजांच्या मठामध्येही विविध उत्सव साजरे केले जातात.
‘गण गण गणात बोते’ या महाराजांचा आवडता जप मंत्र. या मंत्राचा अखंड जप करत असायचे. यामुळेच त्यांना विविध नावाने सुद्धा ओळखले जायचे त्यांना ‘गजानन महाराज’, ‘शेगावीचे संत’ म्हणूनही ओळखले जायचे. बिरुदुराजू रामराजू लिखीत ‘आंध्रा योगुलु’ नावाच्या पुस्तकामध्ये गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याचा उल्लेख आढळून आला आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळून येते. दोघेही अजानबाहू, परमहंस सन्यासी होते, दोघेही अत्यंत गूढ बोलत असत. स्वामी समर्थ समाधीस्त होण्याच्या काही दिवस आधी गजानन महाराज शेगावात प्रगट झाले होते. या दोन महापुरुषांची भेट घडली आहे, असे अनेकांनी मत स्पष्ट केले आहे. स्वामी समर्थां प्रमाणे गजानन महाराज हे देखीळ स्वयंभू आहेत. दोघांमधील साम्य त्यांच्या चरितरचे वाचन केल्यावर प्रकर्षाने जाणवते आणि हे दोघे शरीराने दोन देह दिसले तरी प्रत्यक्षात मात्र ते एकच असावे असे वाटते.
गजानन महाराजांना नैवेद्य म्हणून झुणका भाकरी सोबतच हिरव्या मिरच्या, मुळ्याच्या शेंगा, पिठीसाखर अतिशय आवडते. भाविकांनी भक्तिभावाने आणलेले पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, ते कायमच प्रसन्न भावाने सेवन करत असत. ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले, असे पदार्थ महाराज आवडीने ग्रहण करत असत. म्हणूनच महाराजांच्या भंडार्यासाठी इतर पक्वांनांच्या सोबतीने ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य केली जाते. भाविकांसाठी मंदिर व शेगाव रेल्वे स्टेशनपासून आनंद सागरला जाण्यासाठी संस्थानची विनामुल्य बससेवा सुरु केली आहे.