Friday, February 26, 2021
Home Sports News Cricket आयसीसीच्या दशकातील पुरस्कारांमध्ये भारताचाच बोलबाला

आयसीसीच्या दशकातील पुरस्कारांमध्ये भारताचाच बोलबाला

आयसीसीचा दशकातला सर्वोत्तम पुरुष क्रिकेटर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या विराट कोहलीने गेल्या दहा वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०३९६ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्यानं ६६ शतकं आणि ९४ अर्धशतकं झळकावली आहेत. तसंच २०११ सालच्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्यही होता. आयसीसीचा दशकातला सर्वोत्तम वन डे क्रिकेटर पुरस्काराचाही विराट मानकरी ठरला. गेल्या दहा वर्षात वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजारांपेक्षा अधिक धावा फटकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्यानं वनडेत ३९ शतकं आणि ४८ अर्धशतकं लगावली आहेत. तसेच त्याने गेल्या दहा वर्षात वनडेत ११२  झेल पकडले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा आयसीसीचा गेल्या दशकातला सर्वोत्तम पुरुष क्रिकेटर ठरला आहे. गेल्या दशकातल्या सर्वोत्तम वन डे क्रिकेटर पुरस्काराचा मानही विराट कोहलीलाच देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या गेल्या दशकातल्या कामगिरीच्या निकषावर आयसीसीनं तिन्ही फॉरमॅट्समधल्या सर्वोत्तम पुरस्कारांची आज घोषणा केली.

आयसीसीच्या दशकभरातल्या वन डे आणि ट्वेन्टी-20 संघांच्या कर्णधारपदी भारताच्याच महेंद्रसिंग धोनीची निवड करण्यात आली. धोनीच्या नेतृत्त्वाखालील आयसीसीच्या वन डे संघात भारताच्या विराट कोहली आणि रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे. तसंच धोनीच्या नेतृत्त्वाखालील आयसीसीच्या ट्वेन्टी-20 संघात रोहित आणि विराट यांच्यासह भारताच्या जसप्रीत बुमराची निवड करण्यात आली आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आयसीसी स्पिरिट ऑफ द क्रिकेट हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. २०११ सालच्या नॉटिंगहॅम कसोटीत धावचीत झालेल्या इंग्लंडच्या इयान बेलला भारताचा तत्कालिन कर्णधार धोनीने खिलाडूवृत्ती दाखवून माघारी बोलावलं होतं.

आयसीसीच्या दशकातल्या सर्वोत्तम कसोटी क्रिकेटरचा मान ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मिळाला. त्यानं गेल्या दहा वर्षांत ७०४० कसोटी धावा केल्या आहेत. त्यात २६ शतकं आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या दशकातल्या सर्वोत्तम ट्वेन्टी-20 क्रिकेटरचा मान अफगाणिस्तानच्या रशिद खानला जाहीर करण्यात आला आहे. त्याने या कालावधीत ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक ८९ विकेट्स घेतल्या आहेत. रशिद खानने गेल्या दहा वर्षांत ट्वेन्टी-20 मध्ये एकाच सामन्यात तीनवेळा चार विकेट्स आणि दोनवेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. आयसीसीच्या पुरस्कारांवर प्रामुख्यानं भारताचाच ठसा दिसून आला.

ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी ही आयसीसीची गेल्या दशकातली सर्वोत्तम महिला क्रिकेटर ठरली आहे. एलिस पेरीनं गेल्या दहा वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४३४९ धावा आणि २१३ विकेट्स अशी दुहेरी कामगिरी बजावली आहे. या कालावधीत ती चारवेळा ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-20 विश्वचषक विजेत्या संघाची सदस्य होती. तसेच तिचा समावेश असलेल्या ऑस्ट्रेलिया संघानं एकदा वन डे विश्वचषकाचाही मान मिळवला आहे. ट्वेन्टी-२० आणि वन डे या फॉरमॅट्समधली दशकातली सर्वोत्तम महिला क्रिकेटर या दोन्ही पुरस्कारांवर तिनं आपलं नाव कोरले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments