मार्च महिन्या पासून सुरु असलेल्या कोरोना संक्रमण काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रा मधील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्यात लॉकडाउन घोषणा केल्यापासून सर्वच धार्मिक स्थळे बंद आहेत. परंतु राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतरही अजूनही धार्मिक स्थळे बंद का? असा सवाल जनतेमधून केला जात आहे. त्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला.
प्रथम त्यांनी पाश्च्यात देशामध्ये आलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेबद्दल माहिती दिली. तशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये पुन्हा उद्भवू नये यासाठी प्रत्येकाने व्यक्तिश: किती सतर्कता बाळगली पाहिजे याबद्दल सूचना दिल्या. त्याचवेळी त्यांनी अनेक विषयांवर सविस्तरपणे माहिती दिली. धार्मिक स्थळे कधी उघडणार असे मला गेल्या ब-याच महिन्यापासून विचारण्यात येत आहे, त्याचप्रमाणे सामान्य जनतेसाठी धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी विरोधी पक्षांकडून विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली , त्यामुळे पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे, त्यानंतर योग्य खबरदारी घेऊन व शासकीय नियमानुसारच धार्मिक स्थळे उघडली जातील, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिले. धार्मिक स्थळांबाबतीतील तयार केलेली नियमावली आधी प्रमाणेच सरळ आणि सोपी आहे. मंदिरात प्रवेश करताना तोंडाला मास्क लावणे अनिर्वाय आहे, ठराविक अंतर ठेवून उभे राहणे, कमीत कमी गर्दी होईल याची काळजी प्रत्येकाने घ्यायची, मात्र या नियमावली बद्दल घाई करून चालणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.
घरातील वयोवृद्ध तसेच जेष्ठ नागरिक मंदिरात जातात , इतर महिने कोरोनाच्या काळात आपण एकमेकांना जपत आलो आहोत, जनतेच्या काळजीपोटी धार्मिक स्थळे उघडण्याला विलंब होत आहे , पण तरीही विरोधक माझ्यावर टीका करत आहेत. पण माझ्या राज्यासाठी मी वाईटपणा घेण्यास तयार आहे, माझ्यावर टीका केली तरी चालेल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. त्याचप्रमाणे त्यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जनतेला आवाहन केले आहे कि, राज्यामध्ये कोरोनाचा वेग मंदावला आहे व पाश्च्यात देशांप्रमाणे महाराष्ट्रात दुसरी लाट येऊ नये म्हणून आपणच सर्वांनी घ्यावयाची काळजी म्हणजे दिवे प्रज्वलित करा, फराळ करा, परंतु फटाके न वाजवता सण साजरा करा. राज्यात अनलॉक असल्याने दिवाळीच्या काळात कोरोनाच संसर्ग पसरून रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दिवाळीमध्ये शक्यतो फटाक्यांचा वापर न करण्याचा संकल्प करा. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. वातावरण प्रदूषित झाल्यामुळे संसर्ग वाढतो व कोरोनाचा विषाणू श्वसन संस्थेवर घटक परिणाम करतो. मला फटाक्यांवर बंदी घालायची नाही आहे, पण आत्तापर्यंत आपण खबरदारी बाळगून चाललो आहोत त्याचप्रमाणे सहकार्याची अपेक्षा ठेवतो आहे. तुम्ही मर्यादित प्रमाणात फटाके वाजवू शकता, परंतु सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यावर बंदी असल्याचे त्यांनी नमूद केले.