मुंबई: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. छोट्या पडद्यावर ‘नागिन’ म्हणून घराघरात पोहोचलेली आणि ‘ब्रह्मास्त्र’ सारख्या चित्रपटांतून बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री मौनी रॉय हिच्या वैवाहिक आयुष्यात सध्या वादळ आल्याची चर्चा रंगली आहे. मौनी आणि तिचे पती सूरज नांबियार यांच्यात काहीतरी बिनसल्याचे संकेत मिळत असून, त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
नेमकं प्रकरण काय? काही वर्षांपूर्वीच मोठ्या थाटामाटात विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीने सोशल मीडियावर एकमेकांना ‘अनफॉलो’ केल्याचे नेटकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. आजकालच्या डिजिटल युगात सेलिब्रिटींच्या नात्यातील दुरावा हा सोशल मीडियावरील अशा कृतीतूनच समोर येतो. इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
फोटो डिलीट केल्याच्या अफवा? काही रिपोर्ट्सनुसार, दोघांनीही एकमेकांसोबतचे काही लेटेस्ट फोटो डिलीट केले असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, तपासाअंती असं दिसून आलं की, लग्नाचे आणि जुने काही फोटो अजूनही त्यांच्या प्रोफाईलवर आहेत. पण गेल्या अनेक महिन्यांपासून या दोघांनीही सोबतचा एकही नवीन फोटो शेअर केलेला नाही. ऑगस्ट २०२४ मध्ये मल्याळी नववर्षाच्या निमित्ताने (विशू) त्यांनी शेवटचा फोटो शेअर केला होता. तेव्हापासून दोघांमध्ये असलेल्या शांततेमुळे संशयाची पाल चुकचुकत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया या बातमीवर सोशल मीडिया युजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. “बॉलिवूडमध्ये सध्या घटस्फोटांचा जणू ट्रेंडच सुरू झाला आहे,” अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर काहींनी हे केवळ अफवा असाव्यात अशी आशा व्यक्त केली आहे.
२०२२ मध्ये मौनी आणि सूरजने गोव्यात दाक्षिणात्य आणि बंगाली अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले होते. आता केवळ दोन वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्यांमुळे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. अद्याप मौनी किंवा सूरज या दोघांकडूनही या विषयावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
