कोकणात येणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या कमी असल्याची खंत प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक विशेष रेल्वेगाड्याही काही मर्यादित कालावधीसाठी चालवण्यात येतात. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांवर गर्दीचा ताण असतो. यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वेगाडी १५ जानेवारीपर्यंत चालवण्यात येणार होती; परंतु, ती १२ फेब्रुवारीपर्यंत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नाताळ आणि नववर्षानिमित्त लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते करमाळीदरम्यान साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस चालवण्यात येत होती. १८ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंत ही रेल्वेगाडी चालवण्याचे नियोजन होते; परंतु, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी या रेल्वेला १२ फेब्रुवारीपर्यंत चालवण्याचे नियोजन केले आहे. ही गाडी साप्ताहिक असून, एलटीटीवरून दर गुरुवारी रात्री १२.५० वा. सुटते.
त्यानंतर मडगावला सकाळी ११.१५ वा. पोहोचते तर, तिचा परतीचा प्रवास करमाळी येथून दुपारी १.४० वा. सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी ती रात्री १२.१० वा. एलटीटीला पोहोचते. ही रेल्वे मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीस्कर आहे. रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली कुडाळ, करमाळी आणि मडगाव येथे थांबे आहेत तसेच प्रथम, द्वितीय, तृतीय वातानुकूलित डबा, पॅन्ट्री कार अशी डब्यांची संरचना आहे. ही गाडी उशिराने धावते. तसेच शौचालयात पाणी नसणे, अस्वच्छता असल्याच्या तक्रारी प्रवाशांद्वारे केल्या जात आहेत.
करमाळी गाडीला ‘एलएचबी डबे’ – लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते करमाळी रेल्वेगाडीला २०२१ मध्ये लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) जोडण्यात आले आहेत. हे डबे आधुनिक, स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले प्रवासी रेल्वेडबे आहेत. त्या डब्यांमध्ये अँटीक्लायबिंग उपकरणे आणि अग्निरोधक साहित्यसारख्या अत्याधुनिक सुरक्षा सुविधा आहेत. जुन्या पद्धतीच्या आयसीएफ डब्यांच्या तुलनेत या डब्यांचा कार्यरत वेग अधिक आहे. आयसीएफ डब्यांचा वेग १४० किमी प्रतितास आहे तर, एलएचबी डब्यांचा वेग १६० किमी प्रतितास असून, हा वेग २०० किमी प्रतितासापर्यंत वाढवता येतो. भारतीय रेल्वेमार्गावरील सर्व रेल्वेगाड्यांचे आयसीएफ रेल्वेगाड्यांच्या जागी एलएचबी डबे जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
