रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे बिर्जेवाडी येथे एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. तेजोमय जगदीप डोर्लेकर (वय १५) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सकाळी तेजोमय त्याचा चुलत भाऊ प्रथमेशच्या दुचाकीवर मागे बसून पूर्णगड ते गावडेआंबेरे असा मासे विकून सकाळी ६.३० वा. च्या सुमारास घरी जात होता. त्यांची दुचाकी गावडेआंबेरे-बिर्जेवाडी येथील चढावावर आली असता एका बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने दुचाकीवर मागे बसलेल्या तेजोमयच्या डाव्या पायावर पंजाने हल्ला करून त्याला जखमी केले. बिबट्याने अचानकपणे हल्ला केल्याने दोघेही दुचाकीवरून पडले.
घटनेनंतर बिबट्या जंगलात पळून गेला. बिबट्या अचानक धावत आल्याने तो दुचाकीवर आपटून डोर्लेकर याच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला चावला. त्यामुळे तेजोमय जखमी झाला. त्याला रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर तेजोमय डोर्लेकरच्या नातेवाईकांनी रत्नागिरी येथील वन विभागात जाऊन बिबट्याच्या हल्ल्याची माहिती दिली. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले असून, गावडे आंबेरे येथील नागरिकांना बिबट्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच तेजोमयवर अधिक उपचारांची गरज असल्यास त्याला सर्व ती मदत वन विभागाकडून करण्यात येईल, अशी ग्वाही रत्नागिरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिली.
