जिल्हा पोलिसदलाने सुरू केलेले लोकाभिमुख १७ उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवले जात आहेत. नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे जीवन सुकर व्हावे, त्यांना समाधान मिळावे, यासाठी या मिशनचा उपयोग केला जात आहे. पोलिसदलाच्या या उपक्रमांमुळे कामकाजात सकारात्मक बदल झालेले आहेत. या अंतर्गत राबवलेल्या ‘जीवन मिशन’मधून जिल्ह्यातील ५० हजारपिक्षा जास्त वयोवृद्धाचा डाटा संकलित केला आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसदल प्रयत्न करत आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. पोलिस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, नागरिकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून राबवलेले हे मिशन जिल्हा पोलिसदलाला नव्या दिशेचे उदाहरण ठरणार आहे.
रत्नागिरी पोलिसदलाचा हा उपक्रम आहे. या नवीन उपक्रमामुळे जिल्ह्यातील पोलिस व नागरिक यांच्यातील दुरावा आता कमी होत असून, विश्वासाचे नाते अधिक मजबूत होणार आहे. पोलिसदल समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत करत आहे. केवळ कारवाई नव्हे तर संवाद आणि विश्वास निर्माण करण्यावरही भर दिला जाणार आहे. दरम्यान, राज्यात नव्हे तर देशातही प्रथमच रत्नागिरीत विविध मिशनचा वापर केला जात आहे. त्यांची दखलही घेतली जाणार आहे. या विविध सतरा मिशनमधून नागरिकांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी आगळेवेगळे उपक्रम जिल्ह्यात राबवले जात आहेत. नेहमीच प्रवाहाबाहेर असणाऱ्या गावातील पोलिस पाटील यांनाही पुन्हा जोमाने प्रवाहात आणून त्यांचेही कौतुक केले जात आहे.
रोज एक उपक्रम – या अभियानाची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचावी यासाठी पोलिस प्रशासनाने दररोज एक उपक्रम माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना पोलिसांच्या कार्यपद्धतीची जाणीव होणार असून, सहकार्याची भावना अधिक दृढ होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमांची माहिती घ्यावी व सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाला सूचना किंवा सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
