श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील मंदिर देवस्थानतर्फे येत्या १९ ते २५ जानेवारी या कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मंदिर व मंदिर परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत गणपतीपुळे येथे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात सोमवारी (ता. १९) सकाळी ९.३० ते ११.३० श्रींची महापूजा व प्रसादवाटप होणार आहे. सोमवार ते शुक्रवार (ता. २३) पर्यंत दररोज सकाळी सात ते साडेसात सामुदायिक आरती व मंत्रपुष्प होणार आहे तसेच दररोज सायंकाळी साडेसात ते रात्री साडेनऊ या वेळेत हभप श्रीपाद उपाख्यविनोद बुवा (रा. खोंड. उमरेड, जि. नागपूर) यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. सोमवारी दुपारी ४ ते सायंकाळी ७ वा. गणेशदेवता स्थापना होईल. मंगळवारी (ता. २०) सकाळी सात ते बारा कलशारोहण वर्धापनदिनानिमित्त गणेशयाग पूर्णाहुती दिली जाईल. बुधवारी दुपारी ११ ते १२ सहस्र मोदक समर्पण करण्यात येणार आहे. गुरुवारी माघी यात्रा आहे तसेच दुपारी ४ ते ६ श्रींची पालखी मिरवणूक (प्रदक्षिणा) काढण्यात येणार आहे.
शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता नमिला गणपती- भावगीते, नाट्यगिते भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम अभिषेक काळे (सांगली) व संपदा माने (मुंबई) सादर करणार आहेत. रविवारी दुपारी साडेअकरा ते दोन या कालावधीत महाप्रसाद आहे. रात्री १० वा. श्रीनिवास भगणे लिखित धमाल विनोदी नाटक शांतचं कार्ट आयोजित केले आहे. गणेश प्रासादिक नाट्यमंडळ, गणपतीपुळेतर्फे नाटक सादर केले जाणार आहे. त्यानंतर उत्सव सांगता समारंभ होईल. श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे होणाऱ्या या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन विद्यमान पंचकमिटी सरपंच नीलेश कोल्हटकर, खजिनदार अमित मेहेंदळे, सचिव विद्याधर शेड्ये, पंच डॉ. विवेक भिडे, प्रा. विनायक राऊत, डॉ. श्रीराम केळकर, वेदमूर्ती श्रीहरी रानडे यांनी केले आहे.
