रत्नागिरी-तक्रारदारांना घरबसल्या मिळणार तपासाची माहिती

लाभार्थी तक्रारदार जवळपास १ हजार ४५० आहेत.

Must read

जिल्हा पोलिसदलाने नागरिकाभिमुख प्रशासकीय कामाबाबत मोठे पाऊल टाकले आहे. जिल्ह्यात दाखल होणाऱ्या तक्रारी आणि गुन्ह्यांच्या तपासाची सद्यःस्थिती आता थेट तक्रारदाराच्या मोबाईलवर देणारा ‘मिशन प्रगती’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमामुळे पोलिस ठाण्याचे वारंवार उंबरठे झिजवण्याची गरज नाही. त्यामुळे पोलिसांची पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. अनेकदा पोलिस ठाण्यात तक्रार किंवा एफआयआर दाखल केल्यानंतर पुढे काय कारवाई झाली, याची माहिती सामान्य नागरिकांना मिळत नाही. हीच अडचण ओळखून पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून १० जुलै २०२५ पासून ‘मिशन प्रगती’ची सुरवात करण्यात आली. या अंतर्गत गुन्ह्याचा तपास कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती थेट व्हॉट्सअॅप आणि एसएमएसद्वारे दिली जाते. या उपक्रमाला अल्पावधीतच मोठे यश मिळाले आहे. यामध्ये लाभार्थी तक्रारदार जवळपास १ हजार ४५० आहेत. त्यांना व्हॉट्सअॅप व एसएमएसद्वारे ४ हजार ५०० संदेश पाठवण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयातील २ विशेष पोलिस अंमलदारांमार्फत या कामाचे संनियंत्रण केले जाते.

मिशन प्रगतीअंतर्गत घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण झाला आहे का?, आरोपींना अटक करण्यात आली आहे का? भारतीय नागरिक सुरक्षासंहिता, २०२३ नुसार नोटीस दिली आहे का, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे का? आदींची माहिती मिळते. या उपक्रमामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वास वृद्धिंगत होत आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पोलिसदलाने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि काही त्रुटी आढळल्यास थेट पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलिसदलातर्फे केले आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article