HomeRatnagiriशिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर - पालकमंत्री उदय सामंत

शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर – पालकमंत्री उदय सामंत

लांजा-राजापूरमधील उमेदवार लवकरच जाहीर केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये महायुतीला जिल्ह्यात शंभर टक्के यश मिळेल. चिपळूणमध्ये राष्ट्रवादीसोबत मैत्रिपूर्ण लढत होणार आहे, असे स्पष्ट करीत शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी रत्नागिरीतील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली. रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दाओस दौऱ्यावर जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते. जिल्हा परिषदेसाठी रत्नागिरी, संगमेश्वर व गुहागरमधील काही गटांच्या उमेदवारांची तर रत्नागिरी पंचायत समितीमधील काही गणांमधील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. रत्नागिरी तालुक्यातून पावस गटामधून जिजाऊ संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणाऱ्या अॅड. महेंद्र मांडवकर यांना शिवसेनेमधून उमेदवारी जाहीर केली. रत्नागिरी तालुक्यात खेडशी गटामधून हर्षदा भिकाजी गावडे, शिरगाव गटामधून श्रध्दा दीपक मोरे, गोळप गटामधून नंदकुमार उर्फ नंदा मुरकर, खालगाव गटातून शिवसेना तालुकाप्रमुख महेश ऊर्फ बाबू म्हाप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

रत्नागिरी पंचायत समितीसाठी हातखंबा गणातून विद्या बोंबले, देऊड गणातून नेहा गावणकर, केल्येमधून सुमेश आंबेकर तर नाणीजमधून डॉ. पद्मजा कांबळे, साखरतरमधून परेश सावंत यांना उमेदवारी पालकमंत्री सामंत यांनी जाहीर केली आहे. संगमेश्वरमध्ये कसबा गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचना राजेंद्र महाडीक, मुचरी गटातून माधवी गिते, गुहागर तालुक्यात वेळणेश्वर गटामधून नेत्रा ठाकूर, पडवे गटातून माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांची नावे पहिल्या यादीत जाहीर करण्यात आली. सामंत म्हणाले, शिवसेना-भाजप युतीबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबरच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. युती करताना भाजपाला दिलेला शब्द जिल्हा परिषदेतही पाळला जाईल. राष्ट्रवादीसोबत चिपळूणमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार असून संगमेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी सोबत महायुतीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. याबाबत चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चा झाली आहे. लांजा-राजापूरमधील उमेदवार लवकरच जाहीर केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments