शहरातील लाला कॉम्प्लेक्स रस्त्यावर मोटारीने दुचाकीला उडवले. अपघातात महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुनीता राजेश साळवी (वय ५८, रा. हिंदू कॉलनी, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे. संशयित मोटार चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. अखिल ताजुद्दीन पटेल (रा. उद्यमनगर, रत्नागिरी) असे संशयित चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, रविवारी (ता. १८) सायंकाळी लाला कॉम्प्लेक्स रस्त्यावर संशयित अखिल पटेल याने मोटार निष्काळजीपणे चालवून पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. सुनीता साळवी या दुचाकी चालवत होत्या. त्या जाग्यावरच कोसळल्यानंतर त्यांच्या अंगावरून मोटार गेली. सुनीता साळवी चालवून मात्र, मोटार चालक पटेल याने घटनास्थळावरून पलायन केले. या अपघातात साळवी या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी पथकासह घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांनी तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गायब वाहन चालकाचा शोध घेत होते. सोमवारी पोलिसांनी संशयित अखिल पटेल याला गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
एक उमदे व्यक्तिमत्त्व हरपले – सुनीता साळवी या गेल्या ३० वर्षांपासून रत्नागिरीत ब्युटी पार्लर व्यवसा-यात होत्या. रत्नागिरीतील पहिल्या ब्युटी पार्लर व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. शहरात त्यांची दोन पार्लर आहेत त्यांनी आपल्या कष्टाने हा व्यवसाय नावारूपाला आणला होता. त्यांच्या अशा जाण्याने त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातू आणि मुलगी असा परिवार आहे.
