रत्नागिरी पालिकेतील प्रशासकीय राजवटीत झालेल्या भोंगळ कामांचा आणखी एक ‘नमुना’ पुढे आला आहे. प्लास्टिकबंदीच्या जनजागृतीसाठी चक्क सार्वजनिक शौचालयात ‘कापडी पिशव्यांचे मशीन’ बसवण्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. या कामासाठी सुमारे १० लाखांचे कार्यारंभ आदेश असून, काही लाखांची उधळपट्टी करण्यात आल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. ज्येष्ठ नगरसेविका स्मितल पावसकर यांनी हा अजब प्रकार काल सर्वसाधारण सभेत उघड केला. प्रशासनाकडे याचे उत्तर नव्हते. या संदर्भात पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच बाजू घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. ‘स्वच्छ सर्वेक्षण प्रोत्साहनात्मक अनुदान’ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकबंदीबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने पालिकेने कापडी पिशव्या देणारे ‘कॉईन ऑपरेटेड क्लोथ बॅग वेंडिंग मशीन’ बसवण्याचे काम काढले होते.
नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी हे मशीन सार्वजनिक ठिकाणी बसवण्याची गरज होती. त्याचा प्रसार, प्रचाराची गरज होती. परंतु, पालिका प्रशासनाने याची जनजागृती होणार नाही, अशा ठिकाणी, शहरातील रामआळी येथील सार्वजनिक शौचालयात बसवण्यात आले.ज्या ठिकाणी महिलांच्या आरोग्यासाठी ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन’ आणि ‘डिस्पोजल मशीन’ बसवणे अत्यंत आवश्यक होते; त्या ठिकाणी प्रशासनाने कापडी पिशव्यांचे मशीन बसवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळी आरोग्य हा महिलांचा मूलभूत हक्क असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत काल सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेविका स्मितल पावसकर यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला याची माहिती विचारली; परंतु किती ठिकाणी ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन’ आणि ‘डिस्पोजल मशीन’ बसवल्या आहेत, हे प्रशासनाला सांगता आले नाही. एवढेच नाही तर प्लास्टिकबंदीच्या जनजागृतीसाठीची मशीन रामआळीतील सार्वजनिक शौचालयात का बसवण्यात आले, याचेही प्रशासनाकडे उत्तर नाही.
