पावस पंचक्रोशीत हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या राखणीकरिता स्थानिक कामगार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नेपाळी गुरख्यांची मागणी वाढत आहे; परंतु त्यामुळे अनेकवेळा हाणामारी, खून असे प्रकार घडू लागले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रत्येक बागेतील गुरख्यांची पोलिसांकडे नोंदणी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे; मात्र तरीही केवळ २११ गुरख्यांचीच आतापर्यंत नोंदणी झाली आहे. या परिसरामध्ये आंबा बागायतदार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पावस परिसर आंबा बागायतदार संघाची स्थापना केली आहे. यातील अनेक छोटे बागायतदार आहेत. या आंबाबागेच्या राखणीसाठी स्थानिक कामगार उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे गेली अनेक वर्षे नेपाळमधून कामगार येतात; परंतु त्यातील अनेक गुरख्यांच्या अंतर्गत वाद असतात.
त्याचा परिणाम गावागावातील गुरख्यांमध्ये हाणामारी, खुनाचे प्रकार घडले आहेत. त्याचा परिणाम येथील पोलिस यंत्रणावर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यात पोलिसपाटील व आंबा बागायतदार यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये बागेतील राखणीला असलेल्या गुरख्यांची नोंदणी करण्याचे आवाहन केले होते; मात्र, या आवाहनाला बागायतदारांनी अल्प प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत २११ गुरख्यांची पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यामध्ये नोंदणी केली आहे.
