HomeRatnagiriकृषी विद्यापीठाकडून आंबा बागांची पाहणी...

कृषी विद्यापीठाकडून आंबा बागांची पाहणी…

परिणामांचा उत्पादनावर दूरगामी परिणाम टाळण्यासाठी हे पथक उपाययोजना सुचविणार आहे.

वातावरणातील बदलांचा हापूसवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून आंबा बागांची पाहणी केली जात आहे. या परिणामांचा उत्पादनावर दूरगामी परिणाम टाळण्यासाठी हे पथक उपाययोजना सुचविणार आहे. आज रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांतील सात ठिकाणांच्या आंबा व काजू बागांची पाहणी केली. याचा अहवाल कृषी विभागाला सादर करण्यात येणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत जानेवारी महिन्यात कोकण कृषी विद्यापीठाला पत्र देण्यात आले होते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शास्त्रज्ञांच्या पथकाकडून पाहणी सुरू करण्यात आली आहे. यावर्षी थंडी विलंबाने सुरू झाली होती; मात्र थंडीचा कालावधी अधिक राहिल्यामुळे जिल्ह्यातील आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता; परंतु अतिथंडीमुळे मोहोराचे सेटिंग व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी आंबा बागायतदारांकडून सुरू झाल्या होत्या. याचा फटका आंबा उत्पादनावर होण्याची भीतीही वर्तविली जात आहे. यंदा आंबा हंगाम एक महिना विलंबाने येणार असल्याने बागायतदार सतर्क झालेला आहे. मागील पंधरवड्यात सलग दोन वेळा ढगाळ वातावरण होते.

त्यामुळे कीटकांचा प्रादुर्भावही काही प्रमाणात वाढलेला आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठानेही पावले उचललेली आहेत. आज रत्नागिरी तालुक्यातील शीळ, फणसोप, पावस, केळ्ये, मिरजोळे, फणसवळे परिसरातील आंबा बागायतदारांना भेटून तेथील परिस्थितीचा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आढावा घेतला. विद्यापीठाकडून डॉ. डी. डी. शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख उपस्थित होते. बागायतदार राजन कदम यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच संगमेश्वर तालुक्यातील तुरळ, कोसुंब, ताम्हाणे, चोरवणे या गावांतील बागांची डॉ. अंबरिश यांनी पाहणी केली. दोन वेगवेगळी पथके जिल्ह्यात कार्यरत असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. संगमेश्वरमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, कृषी अधिकारी मनीषा खेडेकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments