समुद्रातील शीतलहरींचा मासळीवर परिणाम मच्छीमार नौका माघारी

या संकटामुळे मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

Must read

अरबी समुद्रात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वादळीवाऱ्यांच्या लहरींमुळे किनारपट्टीवरील मच्छीमारी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. खोल समुद्रातील पाणी गारठल्याने मासळी मिळेनाशी झाली असून, रत्नागिरीतील काही मच्छीमार नौका रिकाम्या माघारी परतत आहेत. या संकटामुळे मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे आता मच्छीमारांसाठी लॉटरी ठरत आहे. एका बोटीच्या सहा दिवसांच्या फेरीचा हिशोब केल्यास खर्च थक्क करणारा आहे. एका ट्रीपसाठी डिझेलचा खर्च अंदाजे तीन लाख रुपये, बर्फ खर्च २५ हजार रुपये, रेशन व पाणी (१७ कर्मचारी) २५ ते ३० हजार रुपये असा एकूण साडेतीन लाख रुपयांहून अधिक खर्च करूनही बोटी रिकाम्या परतत असल्याने मच्छीमार हतबल झाले आहेत. अनेकांनी सुरुवातीचे सहा दिवस मासळी न मिळाल्याने धाडस करून आणखी सहा दिवस (एकूण १२ दिवस) समुद्रात मुक्काम ठोकला; मात्र डिझेल आणि रेशन संपत आल्याने अखेर रिकाम्या बोटी किनाऱ्याला लावण्याशिवाय पर्याय उरला नाही.

सध्या, मासळीची आवक घटल्याने मासळी विक्रेत्या महिलांच्या उत्पन्नावर गंडांतर आले आहे. ‘विक्रीसाठी मालच उपलब्ध नसेल तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्न महिला विक्रेत्यांकडून केला जात आहे. थंड वाऱ्यांचा जोर आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ज्या बोटींना थोडीफार मासळी मिळाली त्यांना मिळालेले उत्पन्न खर्चाच्या १० टक्केही नसल्याचे मच्छीमार सांगत आहेत. समुद्र शांत होऊन मासळी पुन्हा मिळेपर्यंत मच्छीमारांना सावरण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत शासन काय भूमिका घेते, याकडेही त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

आर्थिक मदत जाहीर करा – शीतलहरींमुळे खोल समुद्रातील तापमानात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे मासळी किनाऱ्याजवळ येत नाही. सध्याची स्थिती मत्स्य दुष्काळासारखीच असून, शासनाने मच्छीमारांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article