जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी महाराजांचे उपास्य दैवत संतशिरोमणी गजानन महाराज यांचा प्रकटदिन आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जयंती असा संयुक्त सोहळा श्री क्षेत्र नाणीज येथे शनिवार आणि रविवार असा २ दिवस संपन्न होणार असून त्याची जय्यत तयारी सुरु आहे.. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तमंडळी श्री क्षेत्र नाणीज येथे दाखल होऊ लागली आहेत. सुंदरगडावर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. या निमित्ताने याग, निमंत्रण मिरवणुका, शोभायात्रा, सामाजिक उपक्रम, प्रवचनं अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य सोहळा रविवारी ८ फेब्रुवारीला होणार असून या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर, सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट, रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत व खा, नारायण राणे आणि सौभाग्यवती नीलम राणे हे आवर्जून उपस्थित रहाणार आहेत. या मान्यवरांच्या हस्ते रक्तदान संकल्प पूर्ण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
आजपासून प्रारंभ – दोन दिवसाच्या या वारी उत्सव सोहळ्याची सुरुवाद शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी होईल. सकाळी ९ वा. पासून श्री महामृत्युंजय दक्षिणामूर्तीयाग सुरू होईल. त्यानंतर वाजतगाजत मिरवणुकांनी देवदेवतांना सोहळ्याची निमंत्रणे देण्यात येणार आहेत.
रविवारी मुख्य सोहळा – रविवार हा सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. रविवारी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. पासून सर्वांचे आकर्षण असलेली शोभायात्रा सुरू होईल. त्यात महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, तेलंगणा, येथील लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे. ढोलताशे, लेझीम, हलगी अशी विविध वाद्ये, नृत्ये यांचे सादरीकरण करत भक्तांच्या अभूतपूर्व गर्दीत शोभा यात्रेला प्रारंभ होईल. याम ध्ये जगदुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांचा रथ असेल. देशाच्या विविध आखाड्यांतून आलेल्या साधुसंतांचाही रथ असेल. त्याशिवाय विविध सजीव देखाव्याचे रथही त्यात असतील.
संकल्पपुर्ती निमित्ताने सत्कार – रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सामाजिक उपक्रमांची देशभर चर्चा आहे. अपघातातील जखम साठी रुग्णवाहिकांचा उपक्रम, देहदान, अवयवदान, रक्तदान यामधील त्यांचे योगदान मोठे आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या रक्तदान शिबिरातून १,७१,१५० कुपिकांचे संकलन झाले. हा एक विक्रम आहे. त्यानिमित सोहळ्यात दुपारी रक्तदान संकल्पपूर्ती केलेल्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मान्यवरांच्या हस्ते सत्कार – रक्तदानाचा विक्रम करणाऱ्या कार्यकत्यांचा सत्कार करण्यासाठी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर हे आवर्जून नाणीजला येत आहेत. त्यांच्या समवेत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि सौ. नीलम राणे हे देखील या सोहळ्याला उपस्थित रहाणार असून या सर्व मान्यवरांच्या हस्ते कार्यकर्त्यांना गौरविण्यात येणार आहे.
अमृतमय प्रवास – रविवारी रात्री ७.३० ते ९ प.पू. कानिफनाथ महाराज यांचे हिंदीतून अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर रामानंदचार्य या नरेंद्राचार्यजी यांचे अमृतमय प्रवचन ‘होईल. देवाला साकडे घातले जाईल व सोहळ्याची सांगता होईल.
मोफत आरोग्य शिबीर – दोन्ही दिवस मोफत आरोग्य शिबीराचे आयोजनं, करण्यात आले आहे. त्यात नामवंत डॉक्टर तपासणी व उपचार करणार आहेत. दोन दिवस २४ तास महाप्रसाद आहे. दरम्यान सुंदरगडावर भाविक येण्यास सुरुवात झाली आहे. उद्या मोठ्या संख्येने भाविक येतील. सोहळ्यासाठी सुंदरगड सज्ज झाला आहे.
