भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मैत्रीचा नवा अध्याय आता सुरू झाला आहे. तब्बल १० वर्षांपासून रखडलेला ‘मुक्त व्यापार करार’ (FTA) अखेर यशस्वी झाला असून, दोन्ही देशांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. या करारामुळे केवळ व्यापारालाच चालना मिळणार नाही, तर भारतीय तरुणांसाठी परदेशात नोकरीची मोठी दारे उघडणार आहेत.
काय आहे या करारात?
या करारानुसार, दरवर्षी ५,००० कुशल भारतीय कामगारांना न्यूझीलंडमध्ये ३ वर्षांपर्यंत काम करण्याची परवानगी (व्हिसा) मिळणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये केवळ आयटी तज्ज्ञ किंवा इंजिनिअर्सनाच नाही, तर योग शिक्षक, भारतीय शेफ (आचारी) आणि आयुष तज्ज्ञांनाही विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी:
न्यूझीलंडमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी हा करार ‘जॅकपॉट’ ठरला आहे. आता पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना तिथेच राहून ३ ते ४ वर्षे काम करण्याचा अनुभव घेता येणार आहे.
गुंतवणुकीचा महापूर:
केवळ व्हिसाच नाही, तर न्यूझीलंड आगामी १५ वर्षांत भारतात तब्बल २० अब्ज डॉलर (सुमारे १.६ लाख कोटी रुपये) गुंतवणार आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने उत्पादन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात होणार असल्याने देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.
व्यापाऱ्यांना मोठा फायदा:
आतापर्यंत भारतीय वस्तूंवर न्यूझीलंडमध्ये आयात शुल्क भरावे लागत होते. मात्र, या करारामुळे भारतीय उत्पादने आता तिथे विनाशुल्क विकली जाऊ शकतील. यामुळे कापड, चामड्याच्या वस्तू आणि औषध उद्योगाला मोठी गती मिळणार आहे.
